पडघा-कल्याण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
कायमस्वरूपी खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी
पडघा, ता. ६ (बातमीदार) ः वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा पडघा-कल्याण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वानचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून, नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. फक्त मलमपट्टी नव्हे तर खड्डे कायमस्वरूपी कधी बुजवणार, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
भिवंडी तालुक्यातील पडघा-कल्याण रस्त्यावरील सापे, वाशेरे, आमणे आणि सावद मार्गे कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यांची काही ठिकाणी दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघातांचा धोका वाढला आहे. खड्डे व खराब रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ खडीची मलमपट्टी करून तात्पुरती उपाययोजना केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
वाहतूक कोंडी नित्याचीच
पडघा-कल्याण मार्गावरील आमणे येथे खड्डे पडलेल्या रस्त्याच्या शंभर मीटर अंतरावरच समृद्धी महामार्ग आहे. त्यामुळे महामार्गावर जाण्यासाठी नागरिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो, तर याशिवाय सापे, वाशेरे, आमणे, सावद व बापगाव परिसरात अनेक औद्योगिक गोदामे असल्याने या मार्गावर रात्रंदिवस मालवाहू ट्रक, कंटेनर व जड वाहनांची सतत वर्दळ असते. खड्ड्यांमुळे ही वाहने वारंवार बंद पडतात. परिणामी रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.
काही दिवसांपूर्वीच खड्डे भरले होते, मात्र पावसामुळे पुन्हा खड्डे पडले असून, लवकरच दुरुस्तीचे काम करण्यात येईल.
- दत्तु गीते, उपअभियंता, बांधकाम विभाग
पडघा ः कल्याण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
दत्तु गिते - उपअभियंता फोटो