म्हसा सरपंचांवर दोषारोप निश्चित
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपकाः चौकशी करण्याचे आदेश
मुरबाड, ता. ६ (बातमीदार) ः तालुक्यातील म्हसा ग्रामपंचायत सदस्यांच्या राजीनामाप्रकरणी सरपंच जया घागस यांच्यावर कोकण विभागीय आयुक्तांनी दोषारोप निश्चित केले आहेत. सरपंचांची चौकशी करण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
म्हसा ग्रामपंचायतीच्या नऊपैकी सात सदस्यांनी आपल्या सदस्यपदांचे राजीनामे ३१ मे रोजी मासिक सभेत दिले होते, मात्र या सभेत आणि त्यानंतर २७ जून रोजी झालेल्या सभेत सदस्यांच्या राजीनाम्यावर जया घागस यांनी कोणताही निर्णय घेतला नाही, अशी तक्रार सदस्यांनी केली होती. त्यामुळे हे प्रकरण मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविले होते. मुख्य कार्यकाऱ्यांनी १५ सप्टेंबर रोजी याबाबतचा अहवाल कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला होता. त्यामध्ये जया घागस यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना पदावरून दूर करण्याची शिफारस केली होती.
ग्रामपंचायत बरखास्त होणार?
सरपंच जया घागस यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व दुसऱ्या सदस्याला सरपंचपदी बसण्याची संधी द्यावी, अशी सदस्यांची इच्छा होती, परंतु त्या आपल्या पदाचा राजीनामा देत नसल्यामुळे सात सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन म्हसा ग्रामपंचायत बरखास्त करण्याची खेळी केली, असे सांगितले जाते. सात सदस्यांचे राजीनामे मंजूर झाल्यास ग्रामपंचायत बरखास्त होईल व निवडणूक घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.