ऑनलाइन गेमिंगद्वारे फसवणूक करणारी टोळी गजाआड
८८६ बँक खात्यांचा फसवणुकीसाठी वापर, ८४ कोटींची फसवणूक झाल्याचे उघड
नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) ः प्रतिबंधित असलेल्या ऑनलाइन गेमिंग ॲप्सच्या माध्यमातून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात आंतरराज्यीय टोळीतील १२ सायबर गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. या टोळीने सायबर फसवणुकीसाठी देशभरातील विविध बँकांची ८८६ खाती वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच या टोळीने नागरिकांची सुमारे ८४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे. या कारवाईमुळे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर दाखल झालेल्या तब्बल ३९३ तक्रारींचा छडा लागला आहे.
बँक खाते पुरवणारा सूत्रधार सीबीडीतून जेरबंद
१४ ऑक्टोबरला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आरोपी इम्रान उस्मानी मिनहाज शेख (२३) हा सीबीडी रेल्वेस्थानकाजवळ संशयास्पदरीत्या आढळला. त्याला आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार राहुल पवार यांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत तो नवी मुंबई परिसरातील नागरिकांना शासनाने मान्यता दिलेल्या ऑनलाइन गेमिंगसाठी बँक खाते उघडल्यास आकर्षक रक्कम देण्याचे आमिष दाखवत होता. तसेच त्यांच्याकडून बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड, सिम कार्ड आणि चेकबुक किट स्वत:कडे ठेवून घेत होता. त्यानंतर हे साहित्य तो अवैध गेमिंग ॲप्स चालवणाऱ्यांना पुरवत असल्याचे उघडकीस आले होते.
डोंबिवली, पुण्यातील सायबर अड्डे उद्ध्वस्त
इम्रान शेखच्या चौकशीनंतर या रॅकेटचा पुढील धागा डोंबिवली येथील रुणवाल गार्डन येथे लागला. इम्रानने जमवलेले किट याच ठिकाणी पाठवले जात होते. मध्यवर्ती कक्षाच्या पथकाने तत्काळ डोंबिवली येथे छापा टाकला. येथे प्रतिबंधित गेमिंग आणि सायबर फसवणुकीचे ऑनलाइन प्रकार सुरू असल्याचे आढळले. या कारवाईत जागेवरून फसवणुकीच्या साहित्यासह पाच आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपासात, याच प्रकारची दुसरी टोळी पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील सोमानी ग्रीन होममध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने पिंपरी-चिंचवड (पुणावळे) येथे छापा टाकून ऑनलाइन फसवणुकीच्या साहित्यासह आणखी सहा आरोपींना अटक केली.
रेड्डीबुकसह तीन वेबसाईटचा वापर
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त केलेले लॅपटॉप आणि मोबाईलच्या तांत्रिक तपासणीतून तीन ऑनलाइन प्रतिबंधित गेमिंग आणि सायबर फसवणुकीच्या वेबसाईट उघड झाल्या आहेत. www.Ramesh२४७.com, www.upi९.Pro.com, www.Reddybook.blue या माध्यमातून ही टोळी शेअर मार्केट फ्रॉड, जॉब रॅकेटिंग आणि वर्क फ्रॉम होम, आदी फसवणुकीचे गुन्हे करत असल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीतील बहुतांश आरोपी हे छत्तीसगड आणि बिहार, दिल्ली येथील असून, महाराष्ट्रात तळ ठोकून ते देशभरात फसवणूक करत असल्याचे तपासात निष्पन झाले आहे. या कारवाईत ५२ मोबाईल फोन, सात लॅपटॉप, ९९ डेबिट कार्ड, ६४ पासबुक आणि एक टाटा सफारी स्टॉर्म कार असा एकूण १८ लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.
पोलिस पथक
ही कामगिरी सहाय्यक पोलिस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, सचिन कोकरे, सतीश भोसले, महेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक राहुल भदाने आदींच्या पथकाने केली.