महापालिका निवडणुकीत
लाडक्या बहिणींना साद
मुंबईत ‘बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची’ उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची’ हे अभियान सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईतील सहाही जिल्हे पिंजून काढण्यात येणार असून, ठिकठिकाणी मातृशक्ती मेळावे घेण्यात येणार आहेत.
पालिका निवडणुकीनिमित्त भाजपने आघाडी घेतली असून, लाेकांपर्यंत पाेहाेचण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे पालिका निवडणुकीत ‘बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची’ या योजनेतून लाडक्या बहिणीला भाजपने साद घातली आहे.
भाजपने आजपासून मुंबईच्या सहा जिल्ह्यांत ‘बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची’ हे महिला सशक्तीकरणाचे कार्यक्रम सुरू केले आहेत. या कार्यक्रमाची प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी व्यवस्था करीत असून, अधिकाधिक महिलांना या कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
----
मातृशक्ती मेळावे
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने शुक्रवारी (ता. ७) मुंबईतील सहा ठिकाणी ‘वंदे मातरम्’चे गायन होणार आहे. यानिमित्त मातृशक्ती मेळावे भाजप घेणार आहे. गायिका वैशाली सावंत या मातृशक्ती मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
---------------