लग्नाच्या भूलथापा देऊन दोन महिलांची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : लग्नाच्या भूलथापा देऊन दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांची एकूण एक कोटी ५६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत डोंबिवली पश्चिमेकडे राहणाऱ्या पीडित घटस्फोटीत महिलेची (वय ४४) ‘जीवनसाथी’ विवाह संकेतस्थळावरून आरोपी अनिल अजित दातार याच्याशी ओळख झाली. आरोपीने घटस्फोट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, नोकरी लावण्यासाठी आणि इतर अडचणींची कारणे देत जून २०२५ पर्यंत पीडितेकडून ६२ लाख ७५ हजार रुपये घेतले.
दुसऱ्या घटनेत पीडित महिलेला (वय ३०) आरोपी शैलेश प्रकाश रामगुडे (वय ३०) याने इन्स्टाग्रामवर मैत्री करून लग्नाच्या भूलथापा दिल्या. आरोपीने ‘घरावर ईडीची धाड पडली असून, सोने आणि पैसे सोडवण्यासाठी’ मदत हवी असल्याचे सांगून सप्टेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत पीडितेकडून सोने आणि रोख रक्कम मिळून एकूण ९२ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज उकळला. दोन्ही आरोपींनी पैसे आणि ऐवज घेतल्यानंतर महिलांना टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे पीडितांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.