डोंबिवलीत एकावर ग्राहकाचा चाकू हल्ला
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ ः तब्येत ठीक नसल्याने केस कापणार नाही, असे सांगितल्याचा राग आल्याने ग्राहक आणि त्याच्या दोन साथीदारांनी नाभिकावर हल्ला केला. डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावर ही घटना घडली. यात आफताब सलमानी (वय ३१) आणि त्याचा सहकारी जखमी झाला आहे.
दुकानाबाहेर आफताब उभे होते. त्या वेळी तेथे तीन जण आले. एकाने माझे तातडीने केस कापून दे. मला घाईने अन्यत्र जायचे आहे, असे सांगितले. आफताब यांनी माझी तब्येत ठीक नाही. मी आता दुकानात केस कापण्यासाठी जाणार नाही, असे सांगितले. त्या वेळी एका व्यक्तीने, तू मुद्दाम माझे केस कापत नाहीस, असे बोलत शिवीगाळ करीत आफताब यांना मारहाण सुरू केली. तसेच अन्य दोन साथीदारांनीदेखील आफताबवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने वार केले. तर आफताबच्या मदतीसाठी आलेला मोहम्मद या सहकाऱ्याचे डोके आपटून गंभीर जखमी केले. हल्लेखोर तिघेही नंतर दुचाकीवरून फरार झाले. पुढील तपास विष्णूनगर पोलिस करीत आहेत.