पादचारी पूल खुला; समस्या कायम!
वाहनांच्या पार्किंगमुळे प्रवाशांना अडथळा
धारावी, ता. ६ (बातमीदार) : सायन स्थानकासमोरील वाहतूक पूल नूतनीकरणासाठी गेल्यावर्षी ऑगस्टपासून वापरासाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे धारावीतून सायनच्या दिशेला जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. यातून मार्ग काढत पादचाऱ्यांसाठी नव्याने पादचारी पूल उभा करण्यात आला; मात्र धारावीतील लक्ष्मी बाग विभागात वाहने पार्किंग करून ठेवल्याने, रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी उसळत आहे.
एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा पादचारी पूल खुला झाल्याने पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. धारावीतून सायन येथील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जातात. सध्या दिवाळी सुट्टी संपल्याने शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी पादचारी पुलावर व पुलाखाली होत आहे. दरम्यान, लक्ष्मी बाग परिसरात उभ्या केलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. विभाग अध्यक्ष राजेश सोनवणे, उपविभाग अध्यक्ष नितीन दिवेकर, उपविभाग सचिव संदीप कवडे, संदीप कदम, संतोष माने, प्रशांत गायकवाड, जिगर मोरे, मंगेश आगवणे, नागेश बुदबसाय, प्रमोद रसाळ यांनी वाहतूक पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.