मातीच्या गोण्यांवरून ये-जा
शनिनगरमध्ये नाल्यावर पूल नाही, नागरिकांचा धोकादायक प्रवास
बदलापूर, ता. ६ (बातमीदार) ः बदलापूर पश्चिमेतील शनिनगर परिसरातील नागरिकांना रोज जीव मुठीत धरून नाल्यातूनच ये-जा करावी लागत आहे. नाल्यावरील जुना पूल पालिकेने तोडून टाकल्यानंतर नवा पूल उभारण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता उपाय म्हणून मातीच्या गोण्यांवरून नाला ओलांडावा लागत आहे.
शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना या मार्गाने दररोज प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते; मात्र पावसाळा लांबल्याने काम ठप्प झाले. त्यात आता आचारसंहिता लागू झाल्याने पुलाचे काम किमान महिनाभर पुढे ढकलले गेले आहे. शनिनगर भागातील हा नाला शहरातील सर्वात मोठ्या नाल्यांपैकी एक असून, पावसाळ्यात या नाल्यात पाणी भरल्याने परिसरात पूरस्थिती निर्माण होते. तरीसुद्धा पालिकेने या भागात सुरक्षित पर्यायी मार्गाची कोणतीही सोय केलेली नाही. विकासाच्या मार्गावर असलेल्या बदलापूर शहरातील शनिनगर परिसरात नागरिकांना अजूनही नाल्यात मातीच्या गोण्यांवरून ये-जा करावी लागत असल्याची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. नागरिकांनी तातडीने पूल बांधकाम पूर्ण करून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.