उत्तर मुंबईच्या हरित ओळखीला नवे परिमाण!
गोराई, दहिसर मॅंग्रोव्ह पार्कबद्दल पीयूष गोयल यांचे मत
मुंबई, ता. ६ ः गोराई मॅंग्रोव्ह पार्क आणि दहिसर मॅंग्रोव्ह पार्क हे प्रकल्प उत्तर मुंबईच्या हरित ओळखीला नवे परिमाण देणार आहेत. सुमारे ११० कोटींच्या एकत्रित खर्चाने उभे राहत असलेले हे दोन प्रकल्प केवळ पर्यावरणीय जाणिवेचा नवा अध्याय लिहिणार नाहीत, तर उत्तर मुंबईत रोजगारनिर्मिती, पर्यटन, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधणारे आहेत, असे उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. त्यांच्या पुढाकारातून हे प्रकल्प उभे राहत आहेत.
पीयूष गोयल उत्तर मुंबईचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर (मे २०२४) या दोन्ही प्रकल्पांना गती मिळाली आहे. त्यांनी सातत्याने या कामांचा आढावा घेतला असून मुंबईतील विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह (मॅंग्रोव्ह सेल, महाराष्ट्र शासन) एकत्रित प्रकल्प पुनरावलोकन बैठकींच्या माध्यमातून प्रगतीवर लक्ष ठेवले आहे. नोव्हेंबर २०२५च्या पहिल्या आठवड्यात त्यांनी यासंबंधी शेवटचा सविस्तर आढावा घेतला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टिकोनातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वाखाली उत्तर मुंबई हे पर्यटन, शिक्षण, पर्यावरण आणि विकास यांचा समतोल राखणारे एक आदर्श मॉडेल म्हणून उभे राहत आहे. यामुळे रोजगारांच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह- थीमआधारित नागरी जैवविविधता उद्यान’ गोराई मॅंग्रोव्ह पार्क आणि त्यानंतरचा मोठा प्रकल्प म्हणजे दहिसर मॅंग्रोव्ह पार्क हे दोन्ही प्रकल्प शाश्वत पर्यटनाला चालना देतात, तसेच नैसर्गिक आपत्तींपासून शहराचे नैसर्गिक संरक्षण बळकट करतात.
...
भारतातील पहिले नागरी मॅंग्रोव्ह इकोलॉजिकल पार्क
गोराई मॅंग्रोव्ह पार्क हा महाराष्ट्र शासनाच्या मॅंग्रोव्ह सेलद्वारे विकसित होत असलेला भारताचा पहिला मॅंग्रोव्ह- थीमआधारित नागरी जैवविविधता उद्यान आहे, जो गोराईच्या शांत समुद्रकिनारी परिसरात उभा राहत आहे.
...
गोराई प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- या प्रकल्पाचा प्रकार आहे संवर्धनआधारित नागरी इको-टुरिझम पार्क
- खर्च सुमारे ३० कोटी
- प्रकल्प अंतिम टप्प्यात असून लवकरच नागरिकांसाठी खुला होणार
- ८०० मीटर लांबीचा पर्यावरणपूरक उंच लाकडी मार्ग
- दोन मजल्यांचे मॅंग्रोव्ह इंटरप्रिटेशन सेंटर
- पर्यावरणपूरक पर्यटक सुविधा
- हरित लँडस्केपिंग आणि नैसर्गिक सौंदर्य जपणारी बांधकाम रचना
...
दहिसर मॅंग्रोव्ह पार्क
गोराई प्रकल्पाच्या यशावर आधारित, दहिसर मॅंग्रोव्ह पार्क हा मुंबईच्या इको-टुरिझम क्षेत्रातील पुढचा मोठा टप्पा ठरणार आहे. येथे एकाच ठिकाणी मॅंग्रोव्ह जंगलाचा विस्तीर्ण प्रदेश आणि महानगराची दाट नागरी रचना अनुभवता येईल. ‘आकर्षित करा, सहभागी करा आणि शिक्षित करा’ या संकल्पनेवर आधारित हा सुमारे ८० कोटींचा प्रकल्प आहे.
...
दहिसर प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- एकूण क्षेत्रफळ सुमारे ३० हेक्टर
- प्रकल्प खर्च सुमारे ८० कोटी
- अधिकृतरीत्या इको-टुरिझम प्रकल्प म्हणून मंजूर
- नेचर इंटरप्रिटेशन सेंटर- कार्यशाळा हॉल, परिषद कक्ष आणि स्मृतिवस्तू विक्री केंद्र
- मॅंग्रोव्ह आणि खाडीवर चालण्याचा अनुभव