नागावमध्ये सैनिक सन्मान सोहळा उत्साहात
शहीद निलेश तुणतुणे यांच्या आई-वडिलांसह निवृत्त सैनिकांचा गौरव
अलिबाग, ता. ६ (वार्ताहर) : देशासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या सैनिकांच्या त्याग, शौर्य आणि सेवाभावाचा गौरव करण्यासाठी नागाव येथे आयोजित ‘सैनिक सन्मान व ऋणानुबंध सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शहीद निलेश तुणतुणे यांच्या आई-वडिलांसह विविध सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला. वीरमाता अनुराधा गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विद्या गोखले यांच्या पुढाकाराने हा सोहळा बुधवारी (ता. ५) नागावमधील मांजरेकर कॉलनी येथे झाला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून वीरमाता अनुराधा गोरे, पॅरा स्पेशल फोर्सचे सैनिक पांडुरंग आंब्रे, सरपंच हर्षदा मयेकर, अमरनाथ राणे, डॉ. सुरेश गोरेगावकर, निवृत्त कॅप्टन उन्मेश वाणी, तसेच सेवानिवृत्त हवालदार, कर्नल आणि नागावमधील नागरिक उपस्थित होते. देशासाठी लढलेल्या या शूरवीरांना नागाव ग्रामस्थांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात अभिवादन केले.
विद्या गोखले यांनी सैनिकांप्रती असलेल्या कृतज्ञतेतून आणि भावनिक नात्याने हा सोहळा आयोजित केला. “देशासाठी रक्त सांडणाऱ्या सैनिकांनी एकदा तरी आपल्या घरी येऊन वातावरण पवित्र करावे” या भावनेतून हा उपक्रम साकारला. कार्यक्रमाचा हेतू आजच्या तरुण पिढीत सैनिकांविषयी आदर, देशभक्ती आणि सेवाभाव निर्माण करणे हा होता.
सैनिकांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच या सोहळ्यात देशसेवेसाठी प्रेरणादायी विचार मांडण्यात आले. विद्या गोखले यांच्या देशभक्तिपूर्ण उपक्रमाचा सन्मान सरखेल कान्होजी आंग्रे सामाजिक संस्था आणि अखिल भारतीय पूर्ण सैनिक सेवा परिषद, रायगड यांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन उत्तमरीत्या पार पाडले गेले असून निवेदनाचे काम वृषाली वर्तक यांनी केले.
सैनिक सन्मान सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमान आणि कृतज्ञतेचे अश्रू आणत देशभक्तीचे वातावरण भारावून टाकले.