नवमतदारांच्या नावनोंदणी अर्जांचा पूर येईल
मतदार यादीप्रकरणी उच्च न्यायालयाचे निरीक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी लगेचच मतदार नोंदणी अर्ज केल्यास निवडणूक अधिकाऱ्यांकडे अशा अर्जांचा पूर येईल. तसेच अधिकाऱ्यांवर पडताळणीचा ताण वाढेल, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ६) केली.
मतदार यादीत सुधारणा झाल्यावर वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांचा त्यात समावेश केला जाईल, असेही न्या. रियाज छागला आणि न्या. फरहान दुबाश यांच्या खंडपीठाने म्हटले. तसेच मुंबईमध्ये मतदार म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या १८ वर्षांच्या तरुणीच्या अर्जावर सहा आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना दिले. या वर्षी एप्रिलमध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या रूपिका सिंग तरुणीने तिचा मतदार नावनोंदणीचा अर्ज फेटाळ्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच राज्यात मतदार यादी नावनोंदणीची अंतिम तारीख ही १ ऑक्टोबर २०२४ होती. त्यामुळे आपला अर्ज फेटाळल्याचा दावा केला होता. तथापि, मार्च २०२२ पासून प्रलंबित असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसल्यामुळे आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आदेश देण्याची मागणी रूपिकाने याचिकेत केली होती.