बदलापुरातील भूमिपूजनांना ''ब्रेक''!
८१ कोटींच्या उड्डाणपुलासह स्मारकाचे काम थांबले
बदलापूर, ता. ८ (बातमीदार): कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता ४ नोव्हेंबर रोजी अचानक लागू झाल्याने, शहरातील राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. सर्वच पक्ष प्रचाराच्या तयारीत असताना, आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच अनेक नियोजित विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनांना ब्रेक बसला आहे. यामुळे शहरातील राजकीय समीकरणे काहीशी बदलली आहेत.
शहरात सहा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कात्रप ते बेलवली या प्रस्तावित ८१.५० कोटी रुपयांच्या रेल्वेला समांतर ओव्हर ब्रीज अर्थात उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचे काम रखडले आहे. या पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असून, तो झाल्यास बदलापूरच्या पूर्व-पश्चिम भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटणार होती. भाजपकडून शहरभर बॅनर आणि फलक लावण्यात आले होते; मात्र आता आचारसंहितेमुळे हे स्वप्न किमान निवडणुकीनंतरच साकार होईल असे चित्र आहे. त्याच बरोबर कात्रप परिसरातच छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याची मोठी तयारी सुरू होती. आचारसंहिता लागू झाल्याने हा सोहळा देखील रद्द करावा लागला. या प्रकल्पासाठी जागा निश्चित झाल्यापासून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होतं. त्यामुळे भूमिपूजन थांबल्याने नागरिकांमध्ये नाराजीही व्यक्त होत आहे.
इतर कामांवर परिणाम
आचारसंहिता लागू झाल्याने शहरात सुरू असलेली इतर लहानमोठी कामं, रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा योजना, तसेच नवीन आराखड्यांची जाहिरात देखील थांबवण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या भूमिपूजन, उद्घाटन आणि आश्वासनांच्या घोषणांवर आता निवडणूक आयोगाची कात्री चालली आहे. अचानक लागलेली आचारसंहिता हा शहरातील सगळ्या पक्षांसाठी अनपेक्षित धक्का ठरला आहे. अनेक उमेदवार प्रचाराऐवजी कार्यक्रमांद्वारे मतदारांशी संपर्क साधण्याच्या तयारीत होते. आता उमेदवारांना केवळ जनसंपर्कावर भर द्यावा लागणार आहे.
राजकीय गणिते
विकास कामांना ब्रेक लागला असला तरी, लोकशाही प्रक्रियेचा वेग कायम आहे. राजकीय समीकरणे बदलल्यामुळे मतदारांचा मूड काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांची नजर ३ डिसेंबरच्या निकालाकडे लागली आहे.
राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की, ३ डिसेंबरला मतपेटीतून बदलापूरकर आपले मत स्पष्ट करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.