अध्यात्मातून देहदान चळवळीचा ध्यास कौतुकास्पद
माजी महापौर नारायण मानकर यांचे गौरवोद्गार
वसई, ता. ९ (बातमीदार) ः अध्यात्म ही केवळ वैयक्तिक साधना नसून समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी देहदान व अवयवदानासारखी मानवतेला दिशा देणारी चळवळ उभी करून समाजात प्रकाश पेरला आहे, असे गौरवोद्गार वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर नारायण मानकर यांनी काढले. ते वसई (पश्चिम) येथील साईनगर मैदानावर आयोजित पादुका दर्शन सोहळा व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात बोलत होते.
हा कार्यक्रम जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज (दक्षिण पीठ, नाणीजधाम) यांच्या मार्गदर्शनाखाली वसई जिल्हा सेवा समितीच्या वतीने पार पडला. या वेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच संगणक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार राजन नाईक म्हणाले, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज हे समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत स्वयंसेवक रुग्णसेवा, व्यसनमुक्ती, स्वच्छता, दिव्यांग सहाय्य, एड्सग्रस्तांना मदत अशा विविध उपक्रमांतून समाजात परिवर्तन घडवत आहेत. महाराष्ट्रातच नव्हे, तर परदेशातही त्यांच्या विचारांची किरणे पोहोचली आहेत. या वेळी वसई आणि परिसरातील शेकडो गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व संगणक देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. तसेच पादुका दर्शन सोहळ्यामुळे पालघर जिल्हा व आसपासच्या भागातून हजारो भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी नालासोपारा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक, माजी महापौर नारायण मानकर, स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव, माजी सभापती उमा पाटील, माजी आरोग्य सभापती राजेंद्र कांबळी, भाजपचे शेखर धुरी, वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर, पालघर जिल्हा सहसचिव हरिश्चंद्र पाटील, तसेच प्रज्योत पडवळ, कल्पेश मानकर, प्रदीप टेमकर, विलास नाईक, चंद्रशेखर मानकर, विजय घरत आदी मान्यवर उपस्थित होते.