पनवेल परिसरात तीव्र पाणीटंचाई कायम
सिडकोच्या निष्क्रियतेवर माजी आमदार बाळाराम पाटील यांचा संताप
पनवेल, ता. १२ (बातमीदार) ः पनवेल परिसरात तीव्र पाणीटंचाई कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास सचिवांना पत्र पाठवून पाणीटंचाईबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पनवेल, खारघर, कळंबोळी, कामोठे, उलवे, द्रोणागिरी, तळोजा, करंजाडे, काळुंद्रे, नावडे आणि सिडकोच्या इतर वसाहतींमध्ये पाण्याचा तीव्र तुटवडा कायम असून, नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळातही नागरिकांना अभ्यंगस्नानाला पाणी नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात होता. सिडकोकडे स्वतःचे हेटवणे धरण असतानाही, पाइपलाइन गळती, पंपिंग स्टेशनमधील बिघाड आणि देखभालीच्या अभावामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे माजी आमदारांनी पत्रात नमूद केले आहे. अनेक वसाहतींना तीन ते चार दिवसांतून एकदाच, तेही केवळ १० ते १५ मिनिटांचा आणि अत्यल्प दाबाचा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, टँकरवाल्यांकडून मनमानी दर आकारले जात आहेत. या अन्यायकारक परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाट बसत आहे. सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे पनवेल परिसरातील लाखो नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस कृती आराखडा जाहीर करावा, असे बाळाराम पाटील यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
...............
विशेष म्हणजे, सिडको एकीकडे पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत असताना दुसरीकडे नव्या बांधकाम प्रकल्पांना ना हरकत प्रमाणपत्र देत आहे. ही दुहेरी भूमिका चिंताजनक असल्याची टीका पत्रात करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रश्नावर विविध राजकीय पक्षांनी सिडकोविरोधात आंदोलने केली होती. भाजपने पाणी द्या, नाहीतर खुर्ची खाली करा! अशी घोषणा देत मोर्चा काढला होता, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सिडको कार्यालयासमोर हंडे फोडून निषेध नोंदवला होता, मात्र अद्यापही या गंभीर प्रश्नावर ठोस तोडगा निघालेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.