कासा (बातमीदार) : डहाणू नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि निष्पक्ष पार पडावी, यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. या अनुषंगाने दोन फिरती भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.
पहिले भरारी पथक मल्याण पूर्व, सरावली, ब्राह्मणपाडा, लोणीपाडा, अदाणी कॉलनी या परिसरासाठी नियुक्त करण्यात आले असून, हे प्रभाग क्रमांक ३, ४, ५, ६ आणि १३ या क्षेत्रांचे निरीक्षण करणार आहे. दुसरे भरारी पथक आगर, आंबेमोरा, मल्याण पश्चिम, मसोली, वडकून आणि डहाणू गाव या परिसरातील प्रभाग क्रमांक १, २, ७, ८, ९, १०, ११ व १२ यांचे निरीक्षण करणार आहे. ही पथके निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे पालन, बेकायदेशीर प्रचार साहित्य, निधी वापरावर लक्ष ठेवणे, तसेच मतदारांवर दबाव आणण्याच्या प्रयत्नांवर नियंत्रण ठेवणार आहेत. प्रशासनाने या पथकांना आवश्यक वाहनसुविधा, कर्मचारी आणि उपकरणे उपलब्ध करून दिली असून, निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सतत गस्त ठेवली जाणार आहे.