अंबरनाथच्या नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गट आग्रही
‘मशाल’मुळे शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता
अंबरनाथमध्ये निवडणुकीसाठी ‘बदलापूर म्हात्रे पॅटर्न’ची शक्यता
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ ः अंबरनाथ नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात चुरस वाढत असतानाच महाविकास आघाडीकडून मात्र अद्याप स्पष्ट रणनीती समोर आलेली नाही. ठाकरे गट मात्र ‘बदलापूर म्हात्रे पॅटर्न’ अंबरनाथमध्ये राबविण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय वर्तुळात संकेत आहेत. यामुळे शिंदे गटाचे समीकरण बिघडण्याची शक्यता अधिक असल्याचे मानले जात आहे.
आघाडीतील काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या पत्नी नूतन पाटील यांचे नाव आघाडीच्या उमेदवारीसाठी जोरदार चर्चेत आहे. ठाकरे गटाच्या आग्रहामुळे त्यांच्या उमेदवारीचा ‘मशाल’ चिन्हावर गंभीरपणे विचार सुरू असल्याचे समजते. महाविकास आघाडी-मनसे एकत्र येण्याची चर्चा असली तरी अधिकृत घोषणा न झाल्याने उमेदवारीचा तिढा कायम आहे. राष्ट्रवादी (दोन्ही गट) तसेच इतर घटक पक्षांकडे ठोस चेहरा नसल्याने काँग्रेसचाच पर्याय अधिक सक्षम मानला जात आहे.
--
उमेदवारांचा स्वतंत्र प्रचार
भाजपकडून तेजश्री करंजुले यांचे नाव आघाडीवर असून, त्यांचे स्थानिक नेटवर्क आणि प्रदेश नेतृत्वाशी असलेले जवळचे संबंध भाजपला बळकटी देत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर या अग्रस्थानी आहेत. दोन्ही पक्षांत उमेदवारांचा स्वतंत्र प्रचार सुरू असून, वरिष्ठ नेतेही आपल्या उमेदवाराच्या बाजूने सक्रिय झाले आहेत.
--
२०१५ आणि २०१७ मध्ये काँग्रेसचे प्रदीप पाटील यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यंदा मात्र ठाकरे गट ‘मशाल’च्या जोरावर अंबरनाथमध्ये शिंदे गटाला सरळ टक्कर देण्याच्या तयारीत आहे. भाजप या समीकरणात तिसरी निर्णायक बाजू बनू शकते. बदलापूरच्या निवडणुकीत भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना दिलेले तिकीट आणि त्यांचे यश हा ‘म्हात्रे पॅटर्न’ अंबरनाथमध्ये रिपीट करण्याची इच्छा ठाकरे गट व्यक्त करीत असल्याचे बोलले जाते. काँग्रेसच्या नूतन पाटील यांना मशालवर लढण्यासाठी आग्रह वाढत आहे. लोकसभा निवडणुकीत वैशाली दरेकर आणि विधानसभा निवडणुकीत राजेश वानखेडे यांनी मर्यादित आर्थिक सामर्थ्य असूनही शिंदे गटाला त्रासदायक मतसंख्या मिळवली होती. याउलट प्रदीप पाटील हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने ‘मशाल’ घेऊन ताकदीने उभे राहू शकतात, हे ठाकरे गटाचे गणित दिसते. भाजप-शिंदे गटातील अंतर्गत चढाओढ आणि त्यात ‘मशाल’चा प्रवेश या त्रिकोणी लढतीत शिंदे गटाला फटका बसण्याची आणि भाजपचेही गणित विस्कटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.