वसई, ता. १६ (बातमीदार) : वसई-विरार शहरात प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. यात प्रामुख्याने रिक्षांतून प्रवास अधिक केला जातो. प्रवाशांकडून प्रतिव्यक्ती भाडे आकारले जाते, मात्र आता प्रवासी आणि रिक्षांना ‘शेअरिंग’सह मीटर प्रवास असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शहरातील दैनंदिन हजारो प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेलादेखील बळ मिळणार आहे.
वसई-विरारची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. शहरात एकूण ४० हजार रिक्षा प्रवासी वाहतूक करण्यासाठी विविध मार्गांवर धावतात, मात्र या ठिकाणी मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नव्हते. त्यामुळे स्थानक व सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांची वाट पाहत रिक्षा व्यावसायिक उभे राहतात. त्यामुळे कोंडी निर्माण होते व व्यवसायावरदेखील परिणाम होतो. शहरात मीटर रिक्षा सुरू करण्याच्या निर्णय परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिला होता. त्यानुसार आता कार्यवाही करण्यात आली आहे. वसई रेल्वेस्थानकाजवळील एसटी बस डेपो परिसरात मीटर रिक्षासेवेची सुरुवात आमदार स्नेहा दुबे यांच्या हस्ते करण्यात आली.
वसईतील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणारा दैनंदिन प्रवासातील ताण, वेळेची बचत व भाडे प्रणालीचा विचार करण्यात आला आहे. शेअरिंग रिक्षासेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असून, मीटर रिक्षांची भर पडल्याने नागरिकांसाठी प्रवासाचे पर्याय अधिक व्यापक व सुलभ होणार आहे. कोंडी, भाडे आकारणी यामुळे रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये नेहमी घासाघीस होते. मीटर सुरू झाल्याने निश्चित दर आकारला जाणार असल्याने हे वाददेखील मिटणार आहेत. यासाठी किमीनुसार दर निश्चित करण्यात आले असून, दिवसा व रात्री भाडे वर्गीकरण केले आहे. तसेच शेअरिंगनेदेखील ज्या प्रवाशांना प्रवास करायचा असेल, त्यांनाही पर्याय मिळणार आहे. वसईतील वाहतूक व्यवस्थेला नवी गती आणि दिशा देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
वेळेची बचत होण्यासाठी मदत
रिक्षा मीटर, दरपत्रक आदी सेवांची सुरुवात नुकतीच करण्यात आली. त्यामुळे लवकरच वसई-विरार शहरात प्रत्येकाला प्रवास करताना लवकर इच्छितस्थळी जाण्यासाठी अन्य प्रवासी येईपर्यंत तात्कळत उभे राहावे लागणार नाही. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
मीटर रिक्षासेवेमुळे विद्यार्थ्यांसह महिला, नोकरदार, व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर व नियमानुसार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांसाठी मीटर रिक्षासेवेला सुरुवात करण्यात आली. रिक्षाचालक व प्रवाशांकडून प्रतिसाद चांगला असल्याचे दिसले.
- स्नेहा दुबे, आमदार, वसई
शहरातील लोकसंख्या वाढल्यामुळे रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक होऊ लागली आहे. शेअरिंग आणि मीटर दोन पर्याय प्रवाशांना मिळणार असल्याने अत्यावश्यक कामासाठी त्वरित जाण्यास सुलभता निर्माण होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत आहे.
- विजय खेतले, अध्यक्ष, पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा चालक संघटना
- वसई तालुक्यात एकूण रिक्षा ४० हजार
- शहरातील वाहतूक सुरळीत होणार
- प्रवाशांना पर्यायी व्यवस्था
- मीटरमुळे तत्काळ सेवा उपलब्ध
- प्रवाशांच्या वेळेची बचत होणार
मीटरनुसार प्रवासभाडे दरपत्रक
किमी दिवसा मध्यरात्रीनंतर
१.५० २६ ३२
२ ३४ ४३
३ ५१ ६४
४ ६९ ८६
५ ८६ १०७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.