बदलापूरकरांचा श्वास कोंडला
एमआयडीसीत रसायनिक प्रदूषण; अटी, नियम धाब्यावर
बदलापूर, ता. २४ (बातमीदार) ः बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना तीव्र रासायनिक दुर्गंधी आणि वायू प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर संकटामागे एमआयडीसीतील प्लॉट क्र. ए ५८ / ए ५९ वरील ‘मे. काजय रेमेडीज प्रा. लि.’ या कंपनीचा बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्ते युवराज गीध यांनी केला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीला केवळ रासायनिक मिश्रण करण्याची परवानगी दिली आहे, तसेच मिश्रित रसायनांवर कोणतीही प्रक्रिया न करण्याची स्पष्ट अट घातली आहे; मात्र कंपनीतून येणारा उग्र दर्प, बाहेर पडणारे सांडपाणी आणि परिसरातील प्रदूषण पाहता, कंपनी आतमध्ये गुप्त रासायनिक प्रक्रिया करत असल्याचा संशय अधिकच दृढ होत आहे. शहरातील वारंवार होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या तक्रारी या कंपन्यांच्या मनमानी कारभाराकडे बोट दाखवत आहेत. गीध यांनी या कामाचा पर्दाफाश करून, संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत, एमआयडीसी प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
केवळ प्रदूषणच नव्हे, तर या कंपनीने एमआयडीसीच्या सार्वजनिक रस्त्यांवरच अतिक्रमण केले आहे. रसायनांचे रिकामे ड्रम्स, भंगार आणि घातक रसायनयुक्त कचरा थेट रस्त्यावर फेकल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत आणि रस्ते ठप्प झाले आहेत. अशा धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट अधिकृत एजन्सीद्वारे लावणे बंधनकारक असतानाही, कंपनीने नियमांना पायदळी तुडवले असल्याचा आरोप गीध यांनी केला आहे. या कंपनीच्या गैरप्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असून, रासायनिक गळतीमुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे.
स्थानिकांची मागणी
अतिक्रमण आणि कचरा तातडीने हटवावा, तसेच कंपनीला काम करण्याची परवानगी देताना घातलेल्या अटींचे उल्लंघन झाले आहे की नाही, याची तपासणी करावी, नियम मोडणाऱ्या कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या संतप्त स्थानिकांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. संबंधित प्रकाराबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी तसेच महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ विभागाचे अधिकारी यांना यासंदर्भात संपर्क केला असता, संबंधित विभागातील दोन्ही अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारीवरून कंपनीच्या परिसरात जाऊन पाहणी करून, ही कंपनी दोषी आढळल्यास त्यांच्यावर ती कारवाई करणार, अशी प्रतिक्रिया दिली.
एमआयडीसी परिसरातील आतल्या भागात काजय रेमेडीज ही कंपनी असून, कंपनीच्या बाहेर रासायनिक कचरा रस्त्यावर तसाच टाकून ठेवण्यात आला आहे. कंपनीने सगळे नियम धाब्यावर बसवून, नागरिकांचा जीव धोक्यात टाकला आहे. त्यामुळे या कंपनीचे सगळे परवाने तपासून, त्यात आढळणाऱ्या त्रुटींबाबत एमआयडीसी प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, याबाबत मी संबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे.
- युवराज गीध, सामाजिक कार्यकर्ते
संबंधित तक्रारदाराने कंपनीकडे भंगार उचलण्यासाठीचा परवाना मागितला होता; मात्र हे काम करताना त्यांनी आमच्याकडे अधिकच्या पैशांची मागणीसुद्धा केली. त्यामुळे ब्लॅकमेलसाठी संबंधित व्यक्तीने हा प्रकार केल्याचे आम्हाला वाटते. आमच्या कंपनीबाहेर जो काही कचरा होता तो रासायनिक कचरा नसून, प्लॅस्टिकने भरलेल्या पिशव्या होत्या. त्या मी आता बाजूला करून आमच्या कंपनी आवारात ठेवल्या आहेत. तसेच आमच्या कंपनीमध्ये कर्करोगावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचे रसायन बनवले जाते. त्यामुळे आमच्या रसायनांमुळे कर्करोग होतो, ही अफवा पसरवणाऱ्या लोकांनी जाणूनबुजून आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार केला आहे.
- संदेश शिंदे, काजय रेमेडीज कंपनी, बदलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.