डोंबिवलीत रंगणार तीन दिवसीय विशेष व्याख्यानमाला
प्र. के. अत्रे ग्रंथालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ ः कल्याण-डोंबिवली पालिकेच्या प्र. के. अत्रे ग्रंथालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डोंबिवलीत तीन दिवसीय विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली-पूर्व येथील श्री गणेश मंदिर संस्थानात बुधवार (ता. २६) ते शुक्रवार (ता. २८) सायंकाळी सात वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे.
२०१७ साली प्र. के. अत्रे ग्रंथालय ३० वर्षांसाठी गणेश मंदिर संस्थानाकडे हस्तांतरित करण्यात आले. सुमारे एक हजार ६०० सभासदांसह हे शहरातील एक महत्त्वपूर्ण वाचनालय मानले जाते. ५२ प्रकारचे वाचन साहित्य, ३९ हजारांहून अधिक देवघेव स्थितीतील पुस्तके, बारा तासांचे मोफत वृत्तपत्र वाचनालय आणि २५० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सुविधा अशा समृद्ध साहित्यसंपदेमुळे वाचनालयाने डोंबिवलीकरांमध्ये विशेष स्थान मिळवले आहे.
अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने आयोजित व्याख्यानमालेचा आरंभ बुधवारी संविधान दिनानिमित्त होणार असून, ‘संविधान सर्वांसाठी’ या विषयावर अभ्यासक माधव जोशी पहिले पुष्प फुलवतील. गुरुवारी (ता. २७) दुसऱ्या पुष्पात ‘मला शिवराय व्हायचंय!’ या प्रेरणादायी विषयावर अतिश कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवारी शेवटच्या पुष्पात ‘डिजिटल जगात सुरक्षितता : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर संरक्षण’ या विषयावर अभिषेक सोनार आपले विचार मांडतील. व्याख्यानमाला सर्वांसाठी विनामूल्य असून डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गणेश मंदिर संस्थानातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.