उमेदवारीनंतर शेवटच्या दिवशी ‘विश्रांती’चा सल्ला
ॲड. मयूरा मोरे यांचा शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’
रोहा, ता. २५ (बातमीदार) : रोहा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना शिवसेना शिंदे गटाच्या महिला शहरप्रमुख ॲड. मयूरा मोरे यांनी शिवसेनेशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारी जाहीर करून ऐनवेळी ‘विश्रांती घ्या’ असा सल्ला देण्यात आल्याने नाराज झालेल्या मयूरा मोरे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत बलाढ्य राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देण्यासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यात युतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत पहाटे ३ वाजेपर्यंत बैठका सुरू होत्या; मात्र जागावाटपाच्या सूत्रावर शिवसेना (उबाठा) नाराज झाल्याने त्यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. दुसरीकडे, शिंदे गटाची शिवसेना अखेर भाजपसोबत युती करून मैदानात उतरली. दरम्यान, आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ॲड. मयूरा मोरे यांना प्रभाग क्रमांक ६-अ मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती; मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तो प्रभाग भाजपच्या वाट्याला गेल्याने, अचानक त्यांना विश्रांतीचा सल्ला देत उमेदवारीतून बाजूला काढण्यात आले. या घडामोडीमुळे त्या प्रचंड नाराज झाल्या. त्यानंतर रोहा राममारुती चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲड. मयूरा मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, शहराध्यक्ष अमित उकडे, महिला शहराध्यक्षा प्राजक्ता चव्हाण, माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा काफरे, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.................
प्रवेशानंतर बोलताना ॲड. मयूरा मोरे म्हणाल्या, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मला आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली; मात्र पक्षांतर्गत गळचेपी होत राहिली. उमेदवारी दिल्यानंतरही तालुकाप्रमुखांच्या निर्णयामुळे माझा पत्ता कट करण्यात आला. या मनमानी कारभाराला कंटाळून मी शिवसेनेशी फारकत घेत असून आता खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.