कासा, ता. २६ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रवासी, चालकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे लोखंडी ‘सुरक्षा रेलिंग’ बसवण्यात आली आहे; मात्र महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही ‘सुरक्षा रेलिंग’ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बसवलेली ही रेलिंग्ज काही महिन्यांतच गायब झाल्याने महामार्ग प्राधिकरण, गस्ती पथक आणि महामार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मुख्य रस्त्यावरील वेगवान वाहतूक आणि सेवा रस्त्यावरील वाहनांमध्ये सुरक्षित अंतर राहावे, यासाठी रेलिंग बसवण्यात आली होती; मात्र या भागातील रेलिंग एकामागोमाग एक हटवल्या जात असून, चोरीवर कुणाचाच प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट होत आहे. चारोटी हद्दीतील एशियन पेट्रोल पंप ते अल्फा हॉटेल यादरम्यान चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेषत: मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील बहुतेक लोखंडी रेलिंग पूर्णतः चोरीला गेल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरील हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. कारण दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी अनेक मीटर लांबीचे लोखंडी तुकडे चोरीस जाणे आणि तरीही महामार्ग प्रशासन, महामार्ग गस्ती पथक किंवा पोलिसांना याची खबर न लागणे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. यामुळेच या चोरीमागे संघटित टोळीचा हात आहे का किंवा काही कर्मचाऱ्यांच्या संमतीनेच ही चोरी होत आहे का, याबाबत संशय व्यक्त होत आहे.
रेलिंगच्या अभावामुळे सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना मुख्य मार्गावरील वेगवान वाहतुकीचा थेट धोका निर्माण होऊन गंभीर अपघातांची शक्यता वाढू शकते. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चोरी गेलेल्या रेलिंग पुन्हा बसवावीत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
भंगार विक्रेत्यांकडे विक्रीची शक्यता
महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदाराने बसवलेली रेलिंग निकृष्ट दर्जाची आणि सहज तोडता येण्याजोगी असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. यामुळे चोरट्यांना रेलिंग उचकटणे अधिक सोयीचे ठरत असून लोखंड चोरीचा सपाटा कायम राहिला आहे. चोरी गेलेल्या लोखंडी सामग्रीची विक्री कोणत्या भंगार विक्रेत्यांकडे होत आहे, याचा तपास करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
महामार्गावरील रेलिंग चोरीचा प्रकार गंभीर आहे; मात्र या घटनेविषयी आम्हाला अद्याप माहिती मिळालेली नव्हती. या बाबतीत ठेकेदारांना सूचना देण्यात येईल आणि अशा चोरींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
- सुहास चिटणीस, विभागीय व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.