वाहनचालकांवरील दंडाचे खटले निकाली काढण्याची सुसंधी
राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घेण्याचे वाहतूक विभागाचे आवाहन
ठाणे शहर, ता. २७ (बातमीदार) ः ठाणे वाहतूक विभागाकडून वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांकडून दंड वसुलीसाठी कठोर पावले उचलली जात असून वाहनधारकांकडून थकीत दंड वसूल केला जात आहे. ज्या वाहनचालकांनी दहापेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचा भंग केला आहे त्यांच्यावर मोठ्या कारवाईची टांगती तलवार लटकत आहे; मात्र या दंडाची रक्कम कमी करून घेण्याची अखेरची संधी वाहतूक विभागाने चालकांना दिली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये दंड आकारला जातो. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंडाचे ई-चलान वाहनचालकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते. अनेकदा वाहनचालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा चालकांवर खटला दाखल करण्यात येतो. अशी अनेक प्रकरणे प्रलंबित असून ती निकाली काढण्याची संधी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये चालकांना उपलब्ध झाली आहे.
१३ डिसेंबर रोजी ठाणे आयुक्तालयातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीत चालकांना तडजोडीतून दंड कमी करून घेता येणार आहे. त्यासाठी नजीकच्या वाहतूक उपविभाग कार्यालयात संपर्क साधून राष्ट्रीय लोकअदालतीचा उपयोग करून घेता येणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त वाहनचालकांनी थकीत दंडाची रक्कम कमी करून घ्यावी, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
हजारो वाहनचालकांना १०पेक्षा जास्त वेळा वाहतुकीचा नियमभंग केल्याचे चलान पाठवण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते दंड त्यांना भरावे लागणार आहेत. वाहन पासिंग, खरेदी-विक्री अशावेळी दंडाची वसुली झल्याशिवाय पुढील व्यवहार होत नाहीत, त्यामुळे दंड कमी करून या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी लोकअदालत हे चांगले माध्यम आहे. त्याचा संबंधितांनी उपयोग करून घ्यायला हवा.
- पंकज शिरसाट, पोलिस उपायुक्त, वाहतूक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.