तालुक्यातील संभाव्य इच्छुक सरसावले
जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुकीचा तिढा सुटला; मतदारसंघात भेटीगाठी सुरू
पनवेल, ता. ३० (बातमीदार) ः सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आरक्षण मर्यादेच्या घोळामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती व महापालिकांच्या निवडणुका होणार की नाही, यासंदर्भात संभाव्य उमेदवारांना धाकधूक असतानाच पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर मोकळा झाला आहे. या निमित्ताने निवडणुकांचा अनेक दिवसांपासून असलेला तिढा अखेर सुटला आहे. मागील आठवड्यामध्ये शांत बसलेल्या इच्छुकांचा जीव भांड्यात पडला असून, ते पुन्हा कामाला लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, ही निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात कधी सुरू होते, याकडे सर्वांचे डोळे लागून आहेत.
काही दिवसांपासून काही स्थानिक स्वराज संस्थांत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यानुसार शुक्रवारी ता. २८ रोजी न्यायालयाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज संस्था वगळता अन्य ठिकाणी निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दिला. त्यामुळे या निवडणुका होणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्टच झाले आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग वाढला आहे. अनेक दिवसांपासून हात आखडता घेतलेल्या व शांत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी पुन्हा हालचाली गतिमान केल्या आहेत. आपापल्या मतदारसंघात गाठीभेटींसह जनसंपर्क सुरू केला आहे. तसेच पक्षांतर्गत गाठीभेटी सुरू केल्या असून, तिकिटासाठीही मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसत आहे. या निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियासह जनसंपर्कामध्ये सक्रिय असलेल्या इच्छुकांनी आरक्षणाचा विषय न्यायालयात गेल्याने हालचाली कमी केल्याचे पाहायला मिळाले; परंतु न्यायालयाने या प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार दिल्याने पुन्हा इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या.
................
चौकट
नेत्यांकडूनही चाचपणी सुरू;
जिल्हा परिषद आणि महापालिका दोन्ही स्थानिक स्वराज संस्था प्रमुख सत्ता केंद्रे असल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठीही या निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून ही चाचपणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये इच्छुक उमेदवारांकडून सामाजिक कार्य किती वर्षे करत आहात, मतदारसंघात मतांच्या बेरजेचे गणित कसे आहे?, झालेल्या मतदारवाढीमध्ये तुम्हाला मते किती पडू शकतील?, निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुमचे स्वतःचे नियोजन कशापद्धतीने असणार आहे, तुमचे मतदारांचे हक्काचे पॉकेट किती आहे?, निवडणुकीत खर्च करण्याची किती तयारी आहे? अशा स्वरुपाची माहिती घेऊन नेत्यांकडून या इच्छुकांची जणू उलटतपासणीच घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. सर्व माहिती घेतली जात आहे.
.....................
चौकट
सोशल मीडियावर पोस्ट
जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अनेक दिवसांपासून हालचाली कमी झालेल्या इच्छुक व त्यांच्या समर्थकांकडून पुन्हा ''हम भी है मैदान में'' यासह विविध पोस्ट सोशल मीडियावर पाठवायला सुरुवात केली आहे. मतदारंसघातील मतदारांशी अशा पोस्ट टाकून पुन्हा संपर्क करायला सुरुवात केली असल्याचे चित्र आहे.
.................
चौकट
मतदारसंघात सर्व्हे सुरू
राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून जिल्हा परिषद व महानगरपालिका मतदारसंघात सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. यामध्ये कोणाचे पारडे जड आहे, कोणत्या उमेदवाराला पसंती आहे, कोणाचे जनमत चांगले आहे, अशा स्वरुपाची माहिती घेतली जात आहे. यामधून उमेदवारांची निवड करून राजकीय गणित जुळविण्याची तयारी केली जात असल्याचे चित्र आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.