महायुती झाल्यास प्रभाग २०६मध्ये विरोधकांना फटका
समीकरणे बदलल्याने शिवसेनेचे नुकसान होण्याची शक्यता
भारती बारस्कर ः सकाळ वृत्तसेवा
शिवडी, ता. २१ (बातमीदार)
शिवडी विधानसभा मतदारसंघातील शिवडी पूर्व आणि पश्चिम असा दोन विभागांचा मिळून प्रभाग २०६ बनलेला आहे. येथे वर्षानुवर्षे शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे पक्षफुटी झाली किंवा राजकीय गणित बदलली तरी शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला खिंड पडत नाही, असेच घडत आले आहे. मात्र यंदा समीकरण बदलले आहे. महायुती झाल्यास विरोधकांना म्हणजेच शिवसेना ठाकरे गटाला फटका बसण्याची चर्चा प्रभागात कानी पडत आहे.
देशातील सर्वात मोठा पूल म्हणून गौरवण्यात आलेला अटल सेतू प्रभाग २०६मध्ये येतो. तर शिवडी पूर्व भाग हा ६० टक्के मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाच्या मालकीचा आहे. उर्वरित ४० टक्के भाग महापालिका क्षेत्रातील आहे. शिवडी पूर्व भागात शिवडी कोळीवाडा, इंदिरानगर, गाडी अड्डा, जकेरिया बंदर अशा भागांत कोळी बांधव, मुस्लिम आणि उत्तर भारतीय अशी मिश्र लोकवस्ती आहे. तर पश्चिम भागात बहुसंख्य मराठी लोकवस्ती आहे. येथील एकूण लोकसंख्या ५५ हजार असून, ४० हजार मतदार आहेत. २०१७मध्ये हा प्रभाग पुरुष ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होता आणि आता २०२५मध्ये खुल्या प्रवर्गासाठी आहे.
२०१७च्या निवडणुकीत सचिन पडवळ यांनी मोठ्या अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवून पुन्हा एकदा २०६ प्रभागात शिवसेनेचा भगवा फडकवला. तर काँग्रेसचे रामबच्चन मुराई यांना अवघ्या ९५८ मतांनी हार मानावी लागली आणि तिसऱ्या क्रमांकावर भाजपाचे विजय म्हात्रे अपयशी ठरले.
लोकसभा, विधानसभेतील चित्र
लोकसभा निवडणुकीत (ठाकरे गट) शिवसेना अरविंद सावंत हे विजयी झाले. तर विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा शिवसेनेचे अजय चौधरी (ठाकरे गट) यांनी ७४ हजार ८९० मते मिळवत मनसेचे उमेदवार माजी आमदार बाळा नांदगावकर यांचा तब्बल सात हजार १४० मतांनी पराभव करीत विजय मिळवला. मनसेचे बाळा नांदगावकर यांना ६७ हजार ७५० मते तर अपक्ष उमेदवार संजय (नाना) आंबोले यांना पाच हजार ९२५ मतांवर समाधान मानावे लागले. विधानसभा २०२४मध्ये प्रभाग क्रमांक २०६मधून अजय चौधरी यांना पाच हजार मते मिळाली होती.
धुळीचे साम्राज्य
गेल्या तीन वर्षांपासून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रस्त्यांवर साफसफाई झाली नसल्याने रस्त्यालगत मातीचे ढीग व अस्वच्छ्ता पसरली आहे. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी खोकला, दमा यांचे रुग्ण वाढले असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न डोके वर काढू लागला आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे, असे श्री मरिमाता मंदिर उत्कर्ष सेवा मंडळाचे सचिव रवींद्र शिंगे यांनी सांगितले.
मतदारांच्या प्रतिक्रिया
विभागात अनेक ठिकाणी बांधकामांमुळे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालणे जिकिरीचे झाले आहे. परिणामी खड्ड्यात पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया कल्पना भवर यांनी दिली. नवमतदार प्रणय पंदारे म्हणाला, की प्रदूषणमुक्त परिसर झाला पाहिजे. वयोवृद्ध नागरिकांची गरज पाहता रस्त्यांवर ठोस सिंग्नल यंत्रणा, रस्तेदर्शक फलक आणि स्वच्छता हवी, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख समस्या
* शिवडी पूर्व येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाच्या हद्दीत अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य
* इंदिरानगर, जय भीम नगर येथे पाण्याची समस्या
* अधिकृत रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी वारंवार मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाच्या नोटिसा
* शिवडी पश्चिम भागातील बांधकामांमुळे चालण्यासाठी रस्ते उरलेले नाहीत.
* वाहन पार्किंगची गैरसोय
* प्रदूषण
...तर महायुती वरचढ
२०१७च्या निवडणुकीत शिवसेनेचे सचिन पडवळ आणि काँग्रेसचे रामबच्चन मुराई यांच्यात चुरशीची लढत झाली होती. ९५८ मतांनी पराभव झालेल्या रामबच्चन मुराई यांनी काँग्रेसला राम राम करीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे महायुती झाल्यास या प्रभागात युतीला महायुती वरचढ ठरेल का, याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
२०१७च्या निवडणुकीचा निकाल
* एकूण मते - १९, ४५९
१) विजयी उमेदवार - सचिन पडवळ (शिवसेना) - ७,२२०
२) रामबच्चन मुराई (काँग्रेस) - ६,२६२
३) विजय म्हात्रे (भाजपा) - २,६०२
४) (मनसे ) - १,३४९
५) (राष्ट्रवादी काँग्रेस) - ६२९
६) (अपक्ष) - १,३९७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.