रिक्षाचालक मुंबईच्या गतीचे हृदय
चाय पे चर्चा कार्यक्रमात मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
मुंबई, ता. ८ : बोरिवली (पश्चिम) येथे सोमवारी (ता. ८) रिक्षाचालकांसोबत आयोजित ‘चाय पे चर्चा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे दुपारी एल. टी. रोडवरील बच्छेलाल टी हाउस येथे झालेल्या या संवादात सहभागी झाले. शेकडो रिक्षाचालकांनी या कार्यक्रमात हजेरी लावून समस्यांविषयी संवाद साधला.
रिक्षाचालक हे मुंबईच्या गतीचे हृदय आहेत. दररोज कोट्यवधी मुंबईकरांना ऑफिस, शाळा, रुग्णालय, घरात सुरक्षित पोहोचवणारे तुम्हीच आहात. मी स्वतः अनेकदा रिक्षाने प्रवास करतो; जिथे कार पोहोचू शकत नाही, तिथे रिक्षा त्वरित पोहोचते. त्यामुळे मी मनापासून तुम्हाला सलाम करतो. या भावना गोयल यांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले की, जसे तुम्ही वाहतूक क्षेत्राला गती दिली, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला नवी गती दिली आहे. सेवा, चांगले शासन आणि गरीब कल्याण हीच आमची हमी आहे. त्यांनी नमूद केले की झोपडपट्टी पुनर्वसनापासून ते गरीब कल्याण योजनांपर्यंत केंद्र सरकारच्या उपक्रमांनी सामान्य नागरिकांच्या जीवनात गुणात्मक बदल घडवून आणले आहेत.
२१वे शतक भारताचे असेल. उत्तर मुंबईत कौशल्य विकासाचे एक मजबूत इकोसिस्टीम उभे राहात आहे. कांदिवली येथील केंद्र सुरू झाले असून, ठाकूर व्हिलेज आणि सत्रा पार्क, बोरिवली येथे नवीन केंद्रे लवकरच सुरू होतील. तसेच उत्तर मुंबईसाठी कौशल्य विद्यापीठाचीही घोषणा करण्यात आली आहे.
संवादादरम्यान अनेक रिक्षाचालकांकडे स्वतःची रिक्षा नसल्याचे आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे उत्पन्नात घट झाल्याचे समोर आले. यावर गोयल म्हणाले की, अर्ध्याहून अधिक चालकांकडे स्वतःची रिक्षा नाही. सीएनजीच्या समस्येमुळे त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे मी आताच बजाज आणि महिंद्रा कंपन्यांशी चर्चा केली आहे. आमची कल्पना आहे की १००-१०० जणांचे वेल्फेअर ग्रुप तयार करून त्यांना कमी किमतीत, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षा उपलब्ध करून देता येतील. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि प्रदूषणही कमी होईल.
उत्तर मुंबईच्या भविष्यासाठी समर्पित सेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा खासदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ते म्हणाले की, १४ वर्षे मी राज्यसभेत होतो. लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी अत्यंत पुण्याचे कार्य आहे. उत्तर मुंबईतील लोकांची सेवा करणे ही आयुष्यभराची जबाबदारी आणि कृतज्ञता आहे. आपण त्यांच्या जीवनाला नवा दिशा देऊ शकलो, तर ‘विकसित भारत २०४७’मध्ये उत्तर मुंबईचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.