वाहनचालकांवर लिंबू-मिरचीची करणी
वाहतूक विभागाच्या कारवाईमुळे ५०० ते १,५०० रुपयांची बसतेय फोडणी
नितीन जगताप ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः आपण अनेकदा पाहिले असेल की बरेच जण आपले घर, दुकान आणि गाडीमध्ये लिंबू-मिरची लटकवतात. लिंबू-मिरची लटकवल्याने वाईट नजरा दूर होतात, असा काही जणांचा समज आहे; पण या लिंबू-मिरचीमुळे वाहनचालकांवर विघ्न आले आहे. वाहनचालकांवर ५०० ते १,५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.
वाहतूक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक वाहनचालकावर असते; मात्र मुंबईत नियमभंगाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. मुंबईत बेशिस्त वाहनचालकांना चाप बसावा, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. चलान टाळण्यासाठी वाहनचालक वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. कोणी नंबरशी छेडछाड करते, कोणी स्टिकर लावते; पण आता काही वाहनचालक नंबरप्लेटवर लिंबू-मिरची लावत आहेत. लिंबू-मिरची लावल्याने एखादा नंबर झाकला जातो. अस्पष्ट नंबर असल्याने वाहतूक पोलिसांना कारवाई करण्यास अडचणी येत आहेत.
रिक्षा-टॅक्सी तसेच मोठ्या अवजड वाहनांवर अनेकदा लिंबू-मिरची किंवा काळी बाहुली लावल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहनाची कारवाई करताना नंबर स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे कारवाई करण्यास अडथळा येतो. दररोज एका वाहतूक विभागात १० ते १२ प्रकरणे लिंबू-मिरची किंवा काळ्या बाहुलीच्या येतात, असे एका वाहतूक पोलिसाने सांगितले.
वाहनचालक आपला व्यवसाय वाढावा, यासाठी आपल्या वाहनाला लिंबू-मिरची लावतात; परंतु व्यवसाय होवो अथवा न होवो, वाहतूक पोलिसांनी पकडल्यास अस्पष्ट क्रमांक असल्याने केलेल्या कारवाईत त्यांना ५०० ते १,५०० रुपयांचा फटका बसत आहे.
घटना
गोरेगाव येथे एका रिक्षाचालकाला लिंबू-मिरची लावल्यामुळे दोन हजार रुपयांचा दंड बसला आहे. यापूर्वी त्या रिक्षावर पाचशे रुपयांचे चलान आकारण्यात आले होते; परंतु त्याकडे रिक्षाचालकाने दुर्लक्ष केले. त्यानंतरही गाडीला लिंबू-मिरची असल्याने दुसऱ्या गुन्ह्यासाठी पुन्हा एकदा त्याला दीड हजार रुपयांचे चलान आकारण्यात आले असून त्याला दोन हजार रुपये दंड भरावा लागला.
काय आहे नियम?
वाहन खरेदी केल्यानंतर अधिकृत क्रमांक देण्यात येतो आणि तो ठरावीक मापात, स्पष्ट अक्षरात लावणे कायद्याने बंधनकारक आहे; मात्र या नियमांकडे वाहनधारकांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. काही वाहनांवर स्पष्ट क्रमांक न दिसण्यासाठी चालक उघडपणे लिंबू-मिरची आणि काळी बाहुली गाडीच्या नंबरप्लेटला लावत आहेत.
वाहनाचा शोध घेणे कठीण
अशा नियमभंगामुळे केवळ वाहतूक व्यवस्था नव्हे, तर सार्वजनिक सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण होतो. अपघातानंतर संबंधित वाहनाचा क्रमांक अस्पष्ट असेल किंवा नंबरऐवजी नावच लावलेले असेल, तर दोषी वाहनाचा शोध घेणे कठीणच नव्हे तर अशक्य ठरते. यामुळे पोलिस तपासात विलंब होतो.
किती आहे दंड?
वाहन नंबर न दिसल्याने अशा वाहनचालकांवर प्रथम ५००, दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास १,५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे.
वाहन स्पष्टपणे दिसायला हवा. नंबर न दिसण्यासाठी काही केले असल्यास त्या प्रकरणात संबंधित वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहनचालकांनी नंबरशी छेडछाड करू नये.
- अनिल कुंभारे,
सहपोलिस आयुक्त, वाहतूक
अनेकदा वाहनचालक वाहनांवर लिंबू-मिरची किंवा काळी बाहुली लावतात. एखाद्या दुर्घटनेपासून रक्षण होईल, अशी त्यांची यामागे चुकीची भावना असते. तुमच्या वाहन चालवण्यावर तुमचा विश्वास नाही, असा त्याचा अर्थ आहे.
- वर्षा विद्या विलास,
सामाजिक कार्यकर्त्या
वाहनाची नंबरप्लेट अस्पष्ट असल्यास अपघाताच्या वेळी वाहनाची त्वरित ओळख पटत नाही, त्यामुळे जखमी व्यक्तीला वेळेत मदत मिळण्यात आणि नातेवाइकांशी संपर्क साधण्यात अडथळे येतात. नंबरप्लेटवर लिंबू-मिरची, बाहुली किंवा अन्य वस्तू लावल्यामुळे रस्ता सुरक्षा धोक्यात येते व कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण होतो. अंधश्रद्धेला बळी न पडता नागरिकांनी स्पष्ट, नियमांनुसार नंबरप्लेट वापरणे आवश्यक असून, हे रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
- सुशील पठारे, वाहतूक अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.