वाशी, ता. १४ (बातमीदार) : घणसोली परिसरात माथाडी कामगार वास्तव्यास असलेल्या सिडकोनिर्मित सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा बहुप्रतिक्षित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. यासंदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित झाले आहे. अखेर रविवारी (ता. १४) घणसोली येथे माथाडी हाऊसिंग प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सात सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांची संयुक्त बैठक पार पडली. सोसायट्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये भगवती कन्स्ट्रक्शन या विकसकांची बहुमताने निवड करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून घणसोलीतील माथाडी कामगारांच्या सिडकोनिर्मित सोसायट्यांच्या इमारती मोडकळीस येऊ लागल्या आहेत. भिंतींना भेगा, गळती, सांडपाणी व पावसाळ्यातील पाण्याचा त्रास, तसेच वीज आणि पाणीपुरवठ्याच्या जुनाट यंत्रणांमुळे रहिवाशांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत होते. काही ठिकाणी संरचनात्मकदृष्ट्या इमारती धोकादायक अवस्थेत पोहोचल्याने अपघाताची भीती कायम होती. या पार्श्वभूमीवर पुनर्विकासाची मागणी सातत्याने होत होती, मात्र सभासदांमध्ये मतभेद, विकासक निवडीबाबत शंका, तसेच हक्क व लाभांविषयी गैरसमज असल्याने प्रक्रिया दीर्घकाळ रखडली होती.
रविवारी घणसोली येथे माथाडी हाऊसिंग प्रकल्पांतर्गत येणाऱ्या श्री गणेशकृपा, कै. शिवाजीराव पाटील, कै. आमदार अण्णासाहेब पाटील, माऊलीकृपा, श्री गुरुदेव दत्त, श्री हनुमान आणि ओम साईधाम या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांची बैठक पार पडली. या वेळी सोसायट्यांचे पदाधिकारी, रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत इमारतींची सद्यस्थिती, पुनर्विकासाचे फायदे, कायदेशीर बाबी, विकासकाकडून अपेक्षित सुविधा, तसेच करारातील अटी-शर्ती यावर चर्चा झाली.
विकसक निवडीच्या निर्णयानंतर सभागृहात समाधानाची भावना पसरली. अनेक वर्षांपासून असुरक्षित इमारतींमध्ये राहत असलेल्या माथाडी कामगार कुटुंबांना आता सुरक्षित, मजबूत आणि आधुनिक घर मिळणार असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे. निर्णय जाहीर होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला.
जागतिक दर्जाचा प्रकल्प
भगवती कन्स्ट्रक्शनचे मनजी भौरा यांनी सांगितले की, हा प्रकल्प केवळ इमारती उभारण्यापुरता मर्यादित न राहता एक जागतिक दर्जाचा ठरेल. येथील रहिवासी हे कष्टकरी घटक असून त्यांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्याची आमची सामाजिक जबाबदारी आम्ही गांभीर्याने स्वीकारली आहे.
वाढीव कार्पेट क्षेत्रफळ मिळणार
सर्व सभासदांना वाढीव व कार्पेट क्षेत्रफळ असलेली घरे, आधुनिक सुविधा, दर्जेदार साहित्य, मजबूत संरचना आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याची हमी देण्यात येईल. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवली जाईल, असे भौरा यांनी स्पष्ट केले.
पुनर्विकास प्रक्रियेत सर्व सभासदांचे हक्क जपले जातील, याची दक्षता घेतली जाईल. विकसकासोबत होणारा करार सभासदांच्या संमतीने आणि कायदेशीर सल्ल्यानेच अंतिम केला जाईल. कोणताही सभासद वंचित राहणार नाही, यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करणार आहोत.
- संदीप लंटाबळे, अध्यक्ष, श्री गुरुदत्त सोसायटी
पावसाळ्यात छत गळायचे. लहान मुलांना घरात ठेवणेही अवघड व्हायचे. आता सुरक्षित आणि चांगल्या सुविधा असलेल्या घरात राहण्याची आशा निर्माण झाली आहे. सौरभ शिंदे यांनी या घरांचा पुनर्विकास व्हावा, यासाठी मेहनत घेतली आहे.
- ज्योती चौधरी, रहिवासी
या ऐतिहासिक निर्णयामुळे घणसोलीतील माथाडी कामगारांच्या सिडकोनिर्मित सोसायट्यांच्या पुनर्विकासाला ठोस दिशा मिळाली आहे. येत्या काळात आधुनिक, सुरक्षित आणि सुविधा-संपन्न गृहनिर्माण प्रकल्प साकार होणार असल्याची अपेक्षा आहे.
- आबासाहेब शेडगे, अण्णासाहेब पाटील सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.