डहाणूत नैसर्गिक औषधांसह खतांची निर्मिती होणार
वेस्टपासून बेस्ट उपक्रम; शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन
वाणगाव, ता. २७ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकामी येणारा खर्च व रासायनिक खतांवर होणाऱ्या अवलंबित्वावर मात करण्यासाठी वेस्टपासून बेस्ट असा एक महत्त्वाचा उपक्रम सुरू झाला आहे. येथील कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्र आणि ऑरगॅनिक फॉर्म यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारची नैसर्गिक औषधे व खतेनिर्मिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव, शास्त्रज्ञ भरत कुशारे, तसेच डहाणूचे तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार यांच्या हस्ते पार पडला.
गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीत रासायनिक खतांचा अवलंब मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे जमिनीसह पिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या उच्च किमतीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार वाढला असून, कीड व रोगांवर त्याचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घरच्या घरी सेंद्रिय खत व नैसर्गिक औषधे तयार करून शेतीमध्ये वापर करावी आणि इतर शेतकऱ्यांनाही सेंद्रिय शेतीस प्रवृत्त करावे, असे प्रतिपादन डहाणू येथील सेंद्रिय खत उत्पादक शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी केले.
यावेळी डहाणू नगरपालिका मुख्याधिकारी अक्षय गुडधे, महाराष्ट्र खबर बोर्ड संचालिका डॉ. मीना सिंग, मंडळ कृषी अधिकारी जगदीश पाटील, तसेच स्थानिक शेतकरी, विद्यार्थी व कृषी अभ्यासक उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, की साधारण २०० लिटर कीटकनाशक खरेदी करण्यास दोन ते तीन लाख रुपये खर्च येऊ शकतो; परंतु घरच्या घरी वेस्टपासून सेंद्रिय खत तयार करून त्याचा उपयोग केल्यास खर्च कमी आणि नफा जास्त होऊ शकतो. शेतकऱ्यांना या केंद्रामार्फत सेंद्रिय खत व औषधे प्रत्यक्ष तयार करण्याचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक तांत्रिक सहाय्य मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचा उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्यास मदत होईल. नैसर्गिक खतनिर्मिती आणि वेस्टपासून बेस्ट, ही संकल्पना शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे प्रवृत्त करणार असून, पर्यावरणपूरक शेतीस तसेच आर्थिक स्वावलंबनाला चालना देईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.