कोसबाडच्या महिलांची उद्योग झेप
बचत गटाच्या माध्यमातून यशस्वी; मजुरी सोडून उभारला लाखोंचा उद्योग
वाणगाव, ता. २८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्याची ओळख असलेल्या चिकूला अनेकदा योग्य भाव मिळत नसल्याने बागायतदार हवालदिल होतात. मात्र डहाणू तालुक्यातील कोसबाड येथील आदिवासी महिलांनी या संकटाचे संधीत रूपांतर केले आहे. रोजंदारीसाठी कंपन्यांमध्ये भटकण्याऐवजी येथील साई समर्थ महिला बचत गटाने चिकूवर प्रक्रिया करून ‘चिकाबू’ नावाचा स्वतःचा ब्रँड उभा केला असून, त्या माध्यमातून वर्षाला चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्याची किमया साधली आहे.
भोनरपाडा येथील वैशाली मंडळ, जयश्री इभाड, संगीता इभाड आणि प्रीती इभाड या महिलांनी एकत्र येऊन २०१६ मध्ये या गटाची स्थापना केली. केवळ मजुरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय उभा करण्याच्या जिद्दीतून हा प्रवास सुरू झाला. कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शास्त्रज्ञ रूपाली देशमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांनी चिकू प्रक्रियेचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले. चिकू विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया केल्यास अधिक नफा मिळतो, हे ओळखून या गटाने विविध पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. नवजीवन फाउंडेशनने पुरवलेल्या इलेक्ट्रिक ड्रायर आणि पॅकिंग मशीनच्या मदतीने आज हा गट चिकू चिप्स व पावडर, चिकू लोणचे, चिकूवडी अशी उत्पादने तयार करीत आहे.
या गटाने उत्पादनांच्या गुणवत्तेवर आणि पॅकिंगवर विशेष भर दिला आहे. ‘चिकाबू’ ब्रँडच्या नावाखाली या वस्तू स्थानिक जत्रा, कृषी प्रदर्शने आणि शेतकरी मेळाव्यांत विकल्या जातात. यंदा या गटाने ३०० किलो चिप्स, १०० किलो पावडर आणि ५० किलो लोणच्याची विक्री करून सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांची उलाढाल केली आहे.
हा प्रवास केवळ आर्थिक समृद्धीचा नाही, तर महिलांच्या आत्मविश्वासाचा आहे, असे डॉ. विलास जाधव यांनी नमूद केले. कृषी विज्ञान केंद्राचे अनिल कुमार सिंग यांनी या गटाला अन्न सुरक्षा परवाना मिळवून देण्यासाठी मदत केली. आज या गटातील महिला केवळ स्वतःचे घर चालवत नाहीत, तर परिसरातील इतर महिलांनाही उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करीत आहेत.
-------------
स्थानिक उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य उपयोग करून, सामूहिक प्रयत्न आणि सातत्याने परिश्रम केल्यास ग्रामीण भागातही उद्योग-व्यवसाय उभारता येतो, हे गटातील महिलांनी सिद्ध करून दाखविले आहे. साई समर्थ महिला बचत गटाची कहाणी इतर बचत गटांसाठी एक प्रेरणा आहे.
- डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
-------------
एकजूट, कृषी विज्ञान केंद्राचे सहकार्य, तांत्रिक मार्गदर्शन आणि योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. भविष्यात गटाने उत्पादनाचा विस्तार करून ऑनलाइन विक्री सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- वैशाली मंडळ, अध्यक्ष, साई समर्थ महिला बचत गट, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.