जीवघेणे खड्डे तातडीने बुजवा
महालक्ष्मी उड्डाणपुलावर चार महिन्यांत ३० अपघात; कासा पोलिसांचा कंत्राटदाराला अल्टिमेटम
कासा, ता. २९ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, येथील जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे नाहक बळी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत कासा पोलिस ठाण्याचे अधिकारी अमर पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. पुलावरील धोकादायक खड्डे तातडीने दुरुस्त करण्याच्या कडक सूचना त्यांनी महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदाराला दिल्या आहेत.
महालक्ष्मी उड्डाणपुलावर केवळ खड्डेच नाहीत, तर अनेक ठिकाणी काँक्रिट निघाल्याने आतील लोखंडी सळ्या एक ते दीड इंच वर आले आहेत. भरधाव वेगात येणारी वाहने या सळ्यांवर आदळल्याने टायर फाटणे किंवा नियंत्रण सुटण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या चार महिन्यांत या पुलावर सुमारे २५ ते ३० अपघात झाले असून, यात अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे, तर वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महामार्गावर अछाड ते घोडबंदर दरम्यान कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले; मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नवीन रस्ता असूनही पुन्हा खड्डे पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यातच सुरू असलेल्या संथ दुरुस्ती कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी या प्रश्नी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून, आता प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, वाहनचालकांचा वाढता संताप आणि अपघातांची मालिका पाहता अमर पाटील यांनी कंत्राटदाराला धारेवर धरले. त्यांनी कंत्राटदारासह पुलाची पाहणी केली आणि "खड्डे तातडीने बुजवा, अन्यथा होणाऱ्या परिणामांना जबाबदार राहा," अशा शब्दांत समज दिली.
------------------------
महालक्ष्मी उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे सतत अपघात होत असून अनेक जण जखमी झाले आहेत. वाहनचालकांमध्ये तीव्र असंतोष आहे आणि परिस्थितीचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या वतीने संबंधित ठेकेदारास तातडीने खड्डे दुरुस्त करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
- अमर पाटील, पोलिस अधिकारी, कासा पोलिस ठाणे.
------------------------
महालक्ष्मी उड्डाणपुलावर खड्डेमय रस्त्यामुळे दररोज अपघात होत असून यात महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार निष्काळजीपणा करीत आहेत. अनेक प्रवासी वाहन तसेच मालवाहू वाहनांचे अपघात होत असल्याने वाहनचालक संतप्त आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दुरुस्ती करावी नाहीतर आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.
- संतोष देशमुख, डहाणू तालुकाप्रमुख, शिवसेना शिंदे गट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.