मोखाड्यात हर घर शोषखड्डे अभियान
मनरेगाच्या माध्यमातून गावपाड्यांत स्वच्छतेचा जागर
मोखाडा, ता. २९ (बातमीदार) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मोखाडा तालुक्यात ‘हर घर शोषखड्डे’ अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. पंचायत समिती आणि मनरेगाच्या (रोजगार हमी योजना) माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे तालुक्यातील सांडपाण्याचा प्रश्न सुटणार असून, गावपाडे स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त होणार आहेत.
तालुक्यात एकूण एक हजार ३५० शोषखड्डे बांधण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असून, याची सुरुवात हिरवे-पिंपळपाडा आणि दांडवळ ग्रामपंचायतींपासून करण्यात आली आहे. सांडपाणी साठल्याने होणारा डासांचा प्रादुर्भाव रोखणे आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शोषखड्ड्यांसोबतच तालुक्यात सुमारे १०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्पही पंचायत समितीने केला आहे. या मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून, तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.
-------------
मोखाडा पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर लोकसहभागातून वनराई बांधले जात आहेत. त्याचबरोबर आता प्रत्येक गावपाड्यांत शोषखड्डे मनरेगातून बांधण्याचे काम हाती घेतले आहे. तालुक्याला एक हजार ३५० शोषखड्डे बांधण्याचा ईष्टांक घेतला असून, त्यामधील ३६५ शोषखड्ड्यांची कामे पूर्ण झाली आहेत. सर्वच ग्रामपंचायतीमध्ये शोषखड्डे धावण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
- अक्षय पगार, गटविकास अधिकारी, मोखाडा.