खारघर, ता. ३१ (बातमीदार) : पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपने सर्व मंडळाध्यक्षांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्याने कार्यकर्त्यामध्ये नाराजी पसरली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ४५ वर्षांखालील कार्यकर्त्यांवर मंडळाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे; मात्र स्थानिक पक्षश्रेष्ठींनी उत्तर पनवेलमधून दिनेश खानावकर, कळंबोलीमधून अमर पाटील, कामोठेमधून विकास घरत, खांदा कॉलनीमधून दशरथ म्हात्रे, खारघरमधून प्रवीण पाटील आणि पनवेल शहर येथून सुमीत झुंजारराव या मंडळ अध्यक्षांना पालिका निवडणुकीत उमेदवारी जाहीर केल्यामुळे फिरते खुर्ची राजकारण सुरू असल्याची टीका पक्षांतर्गत होत आहे.
संघटना मजबूत करण्याऐवजी पदांवर मोजक्याच व्यक्तींचे केंद्रीकरण होत असल्याने पक्षातील निष्ठावान, तळागाळात काम करणारे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. याचा थेट परिणाम संघटनात्मक कामावर होण्याची शक्यता आहे. सामान्य कार्यकर्त्यांसाठी भाजपमध्ये खरोखरच संधी आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावरच अशा निर्णयामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होण्याची आणि त्याचा फटका निवडणूक प्रचारावर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.