ठाणे जिल्ह्यात बिनविरोध जाेरात
अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३० उमेदवार विजयी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ठाणे जिल्ह्यातील महापालिकांत बिनविरोध विजयी उमेदवारांचा धडाका अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३० उमेदवार न लढताच विजयी झाले. ठाणे महापालिकेत सात, कल्याण-डोंबिवलीत ११, भिवंडीत पाच आणि पनवेलमध्ये सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांत महायुतीचा दबदबा राहिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भिवंडी महापालिकेत प्रथमच सहा सदस्य बिनविरोध निवडून आले असून सर्व उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत. यामध्ये एका अल्पसंख्याक मुस्लिम उमेदवाराचा समावेश आहे. पनवेलमधून सात उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यात सहा भाजपचे, तर एक अपक्ष उमेदवार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुतीचे ११ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले असून भाजपचे नऊ तर शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. आतापर्यंत कल्याण-डोंबिवलीत भाजपचे १४ तर शिवसेना शिंदे गटाचे सहा असे महायुतीचे एकूण २० उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.
पनवेलमध्ये ७१ जागांसाठी २५५ उमेदवार
महापालिकेमध्ये सात जागा बिनविरोध झाल्यामुळे ७१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी २५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
----
नवी मुंबई महापालिकेत १११ जागांसाठी ४९९ उमेदवार
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. दिवसभरात २६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे १११ जागांसाठी ४९९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यात शिवसेनेचे १११ तर भाजपचा एक अर्ज बाद झाल्यामुळे ११० उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत.
—————————————
मिरा-भाईंदरमध्ये ४३५ उमेदवार रिंगणात
मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी एकंदर ११३ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे ९५ जागांसाठी आता ४३५ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, भाजपमधील बंडखोरी कायम राहिली आहे. बंडखोरी केलेल्या माजी नगरसेवकांपैकी निम्म्याहून अधिक माजी नगरसेवकांनी माघार घेण्यास ठाम नकार दिला आहे.
-----
भिवंडीत ४४३ उमेदवार रिंगणात
भिवंडी महापालिकेसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत २८७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता निवडणुकीच्या रिंगणात ४४३ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. निवडणुकीत १,०३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननीमध्ये ७४ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. त्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत २८७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, तर २२९ उमेदवारांचे दुबार अर्ज होते.
---
वसई-विरारमध्ये ५४७ उमेदवार रिंगणात
वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २८६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता निवडणुकीच्या रिंगणात ५४७ उमेदवार राहिले आहेत. या निवडणुकीत एकही उमेदवार बिनविरोध निवडून आलेला नाही. ८३३ उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.