स्वीकृत नगरसेवकपदी रोहित महाडिक
अंबरनाथ, ता. १४ (वार्ताहर): राजकीय वर्तुळात सध्या घराणेशाहीची चर्चा जोरात असताना अंबरनाथमध्ये मात्र एक आगळावेगळा निर्णय पाहायला मिळाला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एका तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला दिलेला शब्द पाळत रोहित महाडिक यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. थेट जनतेतून नगराध्यक्षपदी भाजपच्या तेजश्री करंजुळे पाटील यांची निवड झाली आहे. शिवसेना शिंदे गटाला २७, भाजपला १४, काँग्रेसला १२, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ तर अपक्षांना २ जागा मिळाल्य आहेत. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे सदाशिव पाटील विजयी झाले. याच प्रक्रियेदरम्यान पाच स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली. रोहित महाडिक (शिवसेना), सुभाष साळुंखे (शिवसेना), विश्वजीत करंजुळे पाटील (भाजप), उमेेश पाटील (भाजप), ॲड. मारुती ढेरे (भाजप) यांची स्विकृत नगरसेवकपदी निवड झाली.
रोहित महाडिक हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी न देता पक्षसंघटनेचे काम करण्याचे आदेश दिले होते. "पक्षासाठी काम करा, तुम्हाला योग्य न्याय दिला जाईल," असे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांना दिले होते. कालच्या निवडीनंतर खासदारांनी आपली ही ''वचनपूर्ती'' केल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.