महापालिकेच्या सीबीएसई शाळांकडे पालकांचा कल
प्रवेशासाठी तब्बल दोन हजारांहून अधिक पालकांचे अर्ज
सकाळ वृत्तसेवा
मुबई, ता. १४ : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत चालवण्यात येत असलेल्या केंद्रीय मंडळाच्या सीबीएसई, आयसीएसई आणि केंब्रीज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळांकडे मुंबईतील पालकांचा प्रवेशासाठी कल वाढला आहे. या शाळांमध्ये नर्सरी, ज्युनियर, सीनियर केजीपासून ते पहिलीपर्यंतच्या वर्गात उपलब्ध असलेल्या जागांवरील प्रवेशासाठी २० जानेवारीपर्यंत पालकांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारपर्यंत (ता. १३) पालकांकडून तब्बल दोन हजार ८११ हून अधिक प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत.
मुंबई महापालिकेच्या केंद्रीय मंडळाच्या एकूण २२ शाळा कार्यरत असून यामध्ये १९ शाळा सीबीएसई मंडळाच्या तर उर्वरित आयसीएसई, आयसीएसई आणि आयबी या मंडळांच्या प्रत्येकी एक शाळा आहेत. महापालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई व केंब्रिज शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये प्रत्येक वर्गासाठी ४० विद्यार्थ्यांची पटसंख्या, तर आयबी शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये ही मर्यादा ३० विद्यार्थ्यांची आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन तुकडीवाढ करण्यात आली आहे. त्यानंतरही पालकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असून, यात गरिबांपासून ते अति श्रीमंत पालकांनीही महापालिकेच्या या शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळावे, यासाठी अर्ज केले आहेत.
महापालिकेच्या केंद्रीय मंडळाच्या सर्व २२ शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांचे आणि विशेषत: संबंधित मंडळांच्या अभ्यासक्रमावरील आधारीत शिक्षण आणि त्याचा पॅटर्न वापरला जातो. यासाठी महापालिका शिक्षण विभागाने प्रशिक्षित अशा शिक्षकांची यासाठी नियुक्ती केली असून, अनेक प्रकारच्या खासगी यंत्रणांचीही शैक्षणिक गुणवत्तेसाठी मदत घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी सर्वच शाळांमध्ये पायाभूत सुविधा, त्यासाठीचा दर्जा अत्यंत चांगल्या पद्धतीने राखला जात असल्याने पालकांचा महापालिकेच्या शाळांकडे कल वाढला असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
असे आहे राखीव आरक्षण
महापाालिकेच्या या केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आरटीई कायद्यानुसार २५ टक्के जागांवर आरटीईसाठी तसेच पूर्व-प्राथमिक वर्गांतील तुकड्यांसाठी महापौरांच्या शिफारशीनुसार १० टक्के जागा राखीव ठेवण्यात आहेत. यासोबतच महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी ५ टक्के जागांचे आरक्षण असून, उर्वरित जागांसाठी ऑनलाइन अर्ज १५ जानेवारीपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. प्राप्त अर्जांची छाननी २२ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार असून, प्रवेशासाठीची सोडत ३ ते ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत काढण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
प्रवेशासाठी आलेले अर्ज
वर्ग विद्यार्थीसंख्या
नर्सरी १,७३७
ज्युनियर केजी ४०५
सीनियर केजी ३९७
पहिली २५४
एकूण अर्ज २,८११
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.