भारतीय विद्यार्थ्यांची युरोपकडे वाढती वाटचाल
‘अमेरिकन ड्रीम’ची चमक तब्बल ६३ टक्क्यांनी घटली
मुंबई ता. १४ : भारतीय विद्यार्थ्यांसाठी एकेकाळी निर्विवाद पहिले पसंतीस्थान असलेले अमेरिकेचे आकर्षण आता झपाट्याने कमी होताना दिसत आहे. भारतातील पहिली ‘एंड-टू-एंड शिक्षण सुविधा देणारी कंपनी ‘ग्यानधन’ यांनी जाहीर केलेल्या स्टडी अब्रॉड २०२३-२०२५ अहवालानुसार, २०२३ ते २०२५ दरम्यान अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या तब्बल ६३ टक्क्यांनी घसरली आहे.
अमेरिकेत अजूनही लाखो विद्यार्थी जात असले तरी, विद्यार्थ्यांचा हा कल स्पष्टपणे बदलत असल्याचे चित्र आहे. याच कालावधीत जर्मनी, आयर्लंड आणि युनायटेड किंगडम यांसारख्या देशांनी दुहेरी आणि तिहेरी टक्केवारीने वाढ नोंदवली आहे. शिक्षणासाठी लागणारा खर्च, करिअर संधी आणि धोरणात्मक निश्चितता या घटकांमुळे भारतीय विद्यार्थी जागतिक शिक्षणाचा नवा नकाशा रेखाटत आहेत. ‘ग्यानधन’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित मेहरा यांनी सांगितले की, ‘गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाच्या मागणीत आमूलाग्र बदल पाहायला मिळतो, आजचे विद्यार्थी अधिक व्यावहारिक निर्णय घेतात. त्यांना परवडणारे शिक्षण, पदव्युत्तर कामाचे स्पष्ट नियम आणि दीर्घकालीन स्थैर्य हवे असते.’ दुसरीकडे यूएस इंटरनॅशनल ट्रेड ॲडमिनिस्ट्रेशनच्या अधिकृत आकडेवारीनुसारही अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा कल कमी होण्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
२०२३ मध्ये अमेरिकेला जाणाऱ्यांचे प्रमाण ५४ टक्के होते, ते २०२५ मध्ये २० टक्के इतके कमी झाले.
अमेरिकेकडे पाठ
- व्हिसा विलंब
- शिक्षणाचा वाढता खर्च
- पदव्युत्तर काम धोरण
- स्थलांतर मार्गांविषयीची अनिश्चितता
विद्यार्थ्यांसाठी प्रमुख घटक
- परवडणारे शिक्षण
- रोजगाराच्या संधी
- धोरणात्मक स्पष्टता
- गुंतवणुकीवरील परतावा
देश २०२३ २०२५ बदल (आकडेवारी टक्क्यांमध्ये)
यूके १६ ३९ १४३ वाढ
कॅनडा ११ २.३३ ७८ घट
ऑस्ट्रेलिया ७ ७ बदल नाही
जर्मनी ४ ९ १२५ वाढ
आयर्लंड ३ ७.६ १५३ वाढ
जर्मनी नवे प्रमुख केंद्र
जर्मन शैक्षणिक विनिमय सेवेच्या आकडेवारीनुसार जर्मनीतील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २०१९-२० यावर्षामध्ये २८,९०५ होती. त्यामध्ये वाढ होऊन ती २०२४-२५ मध्ये ५९,४१९ इतकी झाली आहे. कमी शुल्क, पारदर्शक पदव्युत्तर काम धोरणे आणि मजबूत धोरणामुळे जर्मनी हा देश विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहे. दुसरीकडे, आयर्लंडमधील तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील संधींमुळे वेगाने लोकप्रिय होत आहे. या ठिकाणी गुगल, मेटा, ॲपल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या जागतिक कंपन्यांची उपस्थिती आहे.
आजचे विद्यार्थी अधिक माहितीपूर्ण आणि वास्तववादी निर्णय घेत आहेत. ते अंतिम निर्णय घेण्याआधी अनेक देशांचा अभ्यास करतात. युरोप आणि आशियातील अनेक देश जसे की जर्मनी, आयर्लंड, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये मैत्रीपूर्ण व्हिसा धोरणे आणि रोजगार-आधारित शिक्षण मॉडेलद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहेत. युरोपीय देश आता भारतीय विद्यार्थ्यांच्या पसंतीत अग्रस्थानी आहेत. भविष्यकाळात हे प्रमाण अमेरिकेत आणि कॅनडाच्या धोरणात्मक बदलांवर अवलंबून असेल.
- अंकित मेहरा, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्यानधन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.