मुंबईत आवाज कुणाचा?
अस्तित्व, वर्चस्व आणि सत्तेची निर्णायक लढाई
विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः तब्बल ७० हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेसाठी आज (ता. १४) मतदान होत आहे. २२७ प्रभागांतून रिंगणात असलेल्या १,७१६ उमेदवारांच्या भविष्याचा फैसला एक कोटी तीन लाख मतदार करणार आहेत. तब्बल २० वर्षांनंतर राज व उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. मराठीच्या मुद्याभोवती फिरणाऱ्या या निवडणुका ठाकरे बंधूंसह काँग्रेससाठी अस्तित्वाच्या आहेत. या वेळी कुठल्याही परिस्थितीत मुंबई पालिका ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षापुढे नेमकी काय आव्हाने आहेत, ते बघूयात...
शिवसेना
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिली पालिका निवडणूक आहे. लोकसभा, विधानसभेत आपले राजकीय अस्तित्व सिद्ध केल्यानंतर पालिकेत ती सिद्ध करण्याचे आव्हान पक्षापुढे आहे. ठाकरे गटाचे ६२ माजी नगरसेवक पक्षाने गळाला लावले, त्यापैकी ५९ नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या नगरसेवकांवर पक्षाची खरी भिस्त आहे. भाजपसोबत झालेल्या जागावाटपातून शिवसेनेच्या वाट्याला ९० जागा आल्या आहेत. जवळपास ६६ जागांवर या दोन शिवसेनेमध्ये थेट लढत होत आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी मते मिळवण्याचे आव्हान शिंदे यांच्यापुढे असणार आहे. कारण अजूनही मुंबईत शिवसेनेची संघटना शाबूत आहे.
लढवत असलेल्या जागा- ९०
माजी नगरसेवकांची संख्या- ६२
आव्हान
-मुंबईत स्वतंत्र ताकद दाखवणे
-फुटीर नगरसेवकांना जिंकून आणणे
-ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे एकगठ्ठा मराठी मतांचे आव्हान
भाजप
शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून शिवसेनेसोबत वर्षानुवर्षे पालिकेच्या सत्तेत सहभागी असलेल्या भाजपने २०१७ मध्ये स्वबळावर निवडणूक लढवत ८२ जागा जिंकत मोठे यश मिळवले. मात्र, शिवसेनेने आकड्यांची जुळवाजुळव करत पालिकेतील सत्ता हाती राखली होती. त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईत भाजपचा यशाचा आलेख उंचावत आहे. मुंबईत भाजपचे १७ आमदार आहेत, राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे. या वेळी कुठल्याही परिस्थितीत मुंबई पालिका ताब्यात घेण्याची आक्रमक रणनीती भाजपची आहे. त्यासाठी भाजपची संघटना गेल्या काही वर्षांपासून कामाला लागली आहे. संसाधने आणि संघटनात्मक ताकदीत भाजपचा हात कुणी पकडू शकत नाही. मुंबईतील अटल सेतू, मेट्रोसह विविध पायाभूत सुविधा प्रकल्पावरवर भाजपचा फोकस आहे. मराठी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेतले आहे. उत्तर भारतीय मतांबरोबरच गुजराती, अमराठी मतांवर भाजपची भिस्त आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजपला लढत सोपी राहिली नाही.
यावेळी लढवत असलेल्या जागा - १३७
२०१७ मधील संख्या - ८२
आव्हान
- अमराठी पक्ष असल्याचा शिक्का पुसणे
- मराठी मते वळवणे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
गेल्या तीन दशकांपासून पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, भाजपशी फारकत आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे पक्षाला गळती लागली. मुंबईत ६२ नगरसेवकही शिंदे कॅम्पमध्ये गेले. त्यानंतर पक्षात सुरू असलेली गळती थांबेना. लोकसभा, विधानसभा निवडणुका आघाडीत लढवल्यामुळे, दलित, अल्पसंख्याक असे नवे मतदार पक्षाने जोडले. विधानसभेत २० आमदार निवडून आले, त्यातील १० आमदार मुंबईतले आहेत. त्यामुळे मुंबईनेच ठाकरेंचे अस्तित्व राखल्याचे स्पष्ट झाले. या वेळी ठाकरे यांनी केवळ मुंबई पालिकेवर फोकस केला. काँग्रेस सोबत नसल्यामुळे मुस्लिम मते गमावण्याचा धोका आहे. मात्र, राज ठाकरे सोबत आल्यामुळे मुंबईतील मराठी मते एकवटतील, अशी अपेक्षा पक्षाला आहे. भाजपचा मुंबईतला प्रभाव वाढत चालला आहे. शाखाशाखांवर ठाकरेंची भिस्त आहे. पालिका गमावल्यास शिवसेनेचे अस्तित्व अधिक अंधुक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची झुंज ही निकराची आहे.
यावेळी लढवत असलेल्या जागा- १६३
२०१७ मधील संख्या-८४
आव्हान
- अल्पसंख्याक मते मिळवणे
- मराठी मतांमधील फाटाफूट रोखणे
- भाजपची घोडदौड रोखून पालिकेची सत्ता राखणे
- मुंबईत ठाकरे ब्रँड कायम असल्याचे सिद्ध करणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
या वेळी २० वर्षांनंतर राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. या वेळी मनसे ५१ जागा लढवत आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेला दारुन पराभव पत्करावा लागला, माहीममधून अमित ठाकरे यांचा पराभव झाला. या वेळी राज ठाकरे यांच्या मनसेची ही अस्तित्वाची लढत मानली जाते. शिवाजी पार्कच्या सभेतील राज ठाकरे यांच्या भाषणाने मरगळलेल्या प्रचारात नवे प्राण फुंकले आहेत. मराठी माणसाला केलेले आवाहन मुंबईकरांना किती भावते, ही खरी परीक्षा आहे. मुंबई जिंकल्यास ठाकरे ब्रँड कायम असल्याचे सिद्ध होईल अन्यथा मनसेची राजकीय वाटचाल बिकट असल्याचे मानले जाते.
यावेळी लढवत असलेल्या जागा- ५१
२०१७ मधील जागा- ०७
आव्हान
- मनसेतील अंतर्गत नाराजी
- ठाकरे ब्रँड कायम असल्याचे सिद्ध करणे
- परप्रातींयाविरोधातील भूमिका
काँग्रेस
एकेकाळी मुंबईच्या राजकारणात दबदबा राखून असलेल्या काँग्रेस पक्षाची घसरण १११ पासून ३१ नगरसेवकापर्यंत झाली. मुस्लिम, दलित, उत्तर भारतीय हा पक्षाचा भक्कम जनाधार होता. भाजपच्या उदयामुळे उत्तर भारतीय मतदार तुटला आहे. या वेळी मनसेला सोबत घेतल्यामुळे काँग्रेसने ठाकरेंच्या उबाठासोबत फारकत घेतली आहे. २७ वर्षांनंतर वंचित आघाडीसोबत युती केली आहे. कमकुवत संघटना, विखुरलेले नेते, संसाधनाची कमी या आव्हानासह काँग्रेस या वेळी मैदानात उतरला आहे. मुस्लिम वस्त्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना सपासह इतर पक्षांकडून आव्हान मिळालं आहे. पालिकेत अस्तित्व राखण्याचे व पक्षाची घसरण थोपवण्याचे आव्हान या वेळी मुंबई काँग्रेसपुढे आहे.
लढवत असलेल्या जागा- १५२
२०१७ मधील जागा- ३१
आव्हान
- पालिकेतील घसरण थोपवणे
- दोन आकडी अस्तित्व टिकवणे
- मुस्लिम, दलित जनाधार राखणे
- मताच्या फाटाफुटीत भाजपला फायदा होऊ न देणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.