शाश्वत शेतीकडे वाटचाल
जिल्ह्यात नारळ लागवडीवर भर
वाणगाव, ता. १५ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर उभारले जात असल्याने पुढील आठ ते दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नारळाच्या शहाळ्यांना भविष्यात मोठी मागणी निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी दूरगामी विचार करून मोठ्या प्रमाणावर नारळ पिकाची लागवड करावी व आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा शेती पुरस्कार प्राप्त यज्ञेश सावे यांनी केले.
सावे हे नारळ विकास मंडळ, प्रदर्शन-सह-बीज उत्पादन केंद्र, दापोली, पालघर येथे १२ जानेवारी २०२६ रोजी नारळ विकास मंडळाच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यज्ञेश सावे यांच्यासह कृषिरत्न अनिल पाटील, पालघर कृषी संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. अंकुर ढाणे, उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गभाले, नारळ विकास मंडळ क्षेत्र अधिकारी शैलेंद्र खिलारे तसेच ४० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.
चौकट
शास्त्रज्ञांचे शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन
क्षेत्र अधिकारी शैलेंद्र खिलारे यांनी नारळ विकास मंडळाची स्थापना आणि विस्तार याबद्दल उपस्थित शेतकरीवर्गाला थोडक्यात माहिती दिली. नारळ विकास मंडळाच्या योजना बद्दलची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यज्ञेश सावे यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल तसेच कामातील प्रत्यक्ष आलेले अनुभव उपस्थित शेतकरीवर्गाला सांगितले. उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गभाले यांनी नारळ लागवड आणि आंतरपीक लागवड व्यवस्थापन याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली, तर कीटकशास्त्रज्ञ डॉ. अंकुर ढाणे यांनी उपस्थितांना नारळ पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनाविषयी माहिती दिली.