राजकीय पक्षाचा प्रचार भोवला
पालिकेच्या बीएलओला तक्रारीनंतर हटवले
विरार, ता. १५ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी वाद झाल्याचे दिसून आले. विरारच्या विवा महाविद्यालय, मुळजीभाई मेहता शाळेत महापालिकेच्या बीएलओना भाजपचा प्रचार करताना रंगेहाथ पकडल्याने काहीकाळ वातावरण तंग झाले होते.
निवडणूक केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी असल्याने अनेक चाकरमानी मतदार मतदान केंद्रापर्यंत जाऊनही मतदानाशिवाय परस्पर गेल्याचे सकाळपासून प्रकार दिसून आले. मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नये, असा आयोगाचा नियम आहे; मात्र मोबाईल ठेवण्यासाठी मतदान केंद्रावर कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. अनेक मतदान केंद्रावर मतदान यंत्रावरील ‘शिट्टी’ चिन्ह सहजतेने दाबले जात नाही. तसेच मतदान केंद्रात पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही, असा आरोप बविआचे उमेदवार अजीव पाटील यांनी केला आहे.