ठाणे जिल्ह्यात भाजपची घोडदौड
शिवसेना शिंदे गटालाही यश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ ः शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपने आपल्या विजयाचे घोडे उधळले आहेत. सहापैकी नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवत कमळ फुलवले आहे. उल्हासनगरमध्येही सत्तेच्या जवळ भाजप आहे. तर दुसरीकडे ठाण्यात युतीमध्ये निवडणूक लढवून शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक ७५ नगरसेवक निवडून आणले आहेत; पण भाईंदरचा भाजपच्या ७८ नगरसेवकांचा रेकॉर्ड मोडता आला नाही. कल्याण-डोंबिवलीतही शिंदे गटाने भाजपला मागे टाकले असले, तरी सत्तेत वाटेकरी केले आहे. भिवंडीमध्येही युतीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे तीन महापालिकांवर भाजपचा तर दोन महापालिकांवर शिवसेना शिंदे गटाचा महापौर बसणार आहे. भिवंडीत मात्र त्रिशंकू स्थिती असून काँग्रेसला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या सहा महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम संपला आहे; मात्र या सगळ्यांमध्ये भाजपने जिल्ह्यात मुसंडी मारली आहे. शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. भाजपला ज्या महापालिकांमध्ये आव्हान देण्यात आले, तेथे शिंदे गटाचा पराभव झाला आहे. नवी मुंबईत काटे की टक्कर झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये नाईकांनी टांगा पलटी करत नवी मुंबईत पहिल्यांदाच कमळ फुलवण्याची जबाबदारी चोख पार पाडली.
मिरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती; मात्र येथे शिवसेना शिंदे गटाचे पुरते पानिपत झाले. केवळ तीन जागा मिळाल्या. उल्हासनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपला समसमान जागा मिळाल्या आहेत. येथे भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत होता. तर शिवसेना शिंदे गटाने टीम टीओके आणि साई पक्षाशी युती केली होती. त्यामुळे येथेही भाजप अपक्षांच्या मदतीने महापौर बसवण्याच्या तयारीत आहे.
सहापैकी तीन महापालिकांवर भाजप आपला महापौर बसवणार आहे. त्या तुलनेत शिवसेना शिंदे गटाची पिछेहाट झाली आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाने भाजपसोबत युती केली होती. ठाण्यात शिंदे सेनेचे ७५ शिलेदार निवडून आले आहेत. एकहाती सत्ता स्थापन करण्याइतके बळ असूनही युतीमुळे भाजपला सत्तेत सहभागी करून घ्यावे लागणार आहे. दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीत या दोन्ही पक्षांची युती होऊनही अंतर्गत वर्चस्वाची लढाई सुरू होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये जास्त जागा मिळवण्यात शिवसेना शिंदे गटाला यश आले आहे; पण येथेही भाजप त्यांच्यासोबत सत्तेत बसणार आहे. आता भिंवडीत युती म्हणून हे दोन्ही पक्ष सामोरे गेले होते. तेथे त्रिशंकू असलेल्या परिस्थितीचा फायदा सत्ताधारी कसे उचलतात, हे आता पाहावे लागणार आहे.
भाजपने हातपाय पसरले
ठाणे जिल्ह्याचा गड मजबूत करण्यासाठी भाजपने आखलेली रणनीती यशस्वी झाल्याचे दिसते. सर्वप्रथम शिवसेना शिंदे गटाचे बालेकिल्ले असलेले अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदेचा बुरूज काबीज केला. भाजपचे नगराध्यक्ष निवडून आणले. अंबरनाथमध्ये काही प्रयोग फसले तरी सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक निवडून आणले. बदलापूरमध्ये सत्ता मिळवली. आता सहापैकी पाच महापालिकांमध्ये भाजपने सत्ता मिळवत शिवसेना शिंदे गटाला एकप्रकारे धोबीपछाड दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.