मुरूडमध्ये ‘पद्मदुर्ग शौर्यगाथा’ ऐतिहासिक संमेलन
किल्ल्याच्या ३५० वर्षपूर्तीनिमित्तश आज विशेष कार्यक्रमांचे आयोजन
मुरुड, ता. १७ (बातमीदार) ः दंडा-राजपुरीच्या समुद्रात वसलेल्या सिद्दी जंजिऱ्यावर वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७५ च्या सुमारास पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी केली होती. सिद्दीच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी आणि स्वराज्याच्या आरमाराला बळकटी देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याला हिंदू कालगणनेनुसार यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वाच्या निमित्ताने मुरूड येथे ता. १८ रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पद्मदुर्गाच्या उभारणीत रक्त सांडलेल्या ऐतिहासिक घराण्यांचे वंशज या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, पद्मदुर्गाचे आरमार अधिकारी लायजी सरपाटील यांचे वंशज निलेश सरपाटील तसेच इतिहास तपस्वी आप्पासाहेब परब यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमात राहणार आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते, १९ जानेवारी १६७५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्गाच्या उभारणीसाठी मुहूर्तमेढ उभारण्याबाबत प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राच्या संदर्भानुसार हिंदू कालगणनेनुसार यंदाचे वर्ष हे पद्मदुर्गाच्या मुहूर्तमेढ उभारणीचे ३५० वे वर्ष ठरत आहे. मुहूर्तमेढ म्हणजेच मुरूडकरांची ग्रामदेवता कोटेश्वरी मातेच्या स्थापनेलाही यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. हे सुवर्ण वर्ष अविस्मरणीय बनवण्यासाठी ‘पद्मदुर्ग शौर्यगाथा ऐतिहासिक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने पद्मदुर्ग संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच पद्मदुर्गात दुर्गदर्शनासाठी प्रशिक्षित मार्गदर्शकांची कमतरता लक्षात घेऊन, पर्यटकांची मागणी पूर्ण करण्यासाठी विशेष ‘पद्मदुर्ग मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती रुपेश मोरे यांनी दिली.
.................
कार्यक्रमांची रूपरेषा :
▪ पद्मदुर्ग शौर्यगाथा ऐतिहासिक संमेलन
▪ कोटेश्वरी देवी पूजन व मुहूर्तमेढ पूजन
▪ चित्रकला स्पर्धा
▪ गडदर्शन व मार्गदर्शन
▪ पर्यटकांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन