माती परीक्षण प्रयोगशाळा ठरतेय वरदान
शेतकऱ्यांना अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे झाले शक्य
वाणगाव, ता. १९ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रातर्फे ‘चला जमिनीचे आरोग्य तपासूया’ ही मोहीम राबवली जात असून, शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण आणि तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४० हजार ५०० शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या मातीचे परीक्षण केले आहे.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी या मोहिमेबाबत माहिती दिली. २००५ पासून कृषी विज्ञान केंद्रातील प्रयोगशाळेत माती परीक्षण केले जाते. आतापर्यंत ४० हजार ५०० शेतकऱ्यांच्या जमिनीचे माती परीक्षण करून त्यांना जमीन आरोग्य पत्रिका देण्यात आल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. त्यानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन शेतकरी करत आहेत. संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीत कोणते अन्नघटक आहेत व नियोजित पिकांना त्याची किती आवश्यकता आहे, याबाबतची शिफारस विद्यापीठाच्या वतीने दिलेल्या आरोग्य अहवालात नमूद केली जाते. तसेच केंद्रातर्फे मातीचा नमुना कसा घ्यावा, याचे प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन केले जाते. हे माती नमुने तपासण्यासाठी तीनशे रुपये शुल्क आकारले जात असल्याचे जाधव यांनी सांगितले. शिवाय जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती यांचा प्रचार प्रसार केला जात आहे. तसेच जमिनीची धूप थांबविण्यासाठी मृदा संवर्धन याबाबतचे प्रशिक्षण आयोजित केले जात आहे.
---------------------------------------
जमिनीचा पोत खराब होण्याची कारणे
१. पाणी आणि रासायनिक खतांचा अतिवापर :
आधुनिक शेती पद्धतींमध्ये पाण्याचा आणि रासायनिक खतांचा अतिवापर मातीची नैसर्गिक संरचना आणि पोत बिघडवतो, ज्यामुळे माती कडक होते आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते.
२. पावसाळ्यातील अनियमितता :
मॉन्सूनच्या अनियमिततेमुळे आणि कमी पावसामुळे मातीची धूप वाढते आणि पाण्याची कमतरता जाणवते, ज्यामुळे मातीची सुपीकता कमी होते.
३.जमिनीची धूप :
हवामानातील बदलांमुळे आणि योग्य माती व्यवस्थापनाच्या अभावामुळे मातीची धूप वाढते, ज्यामुळे वरची सुपीक माती वाहून जाते.
जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत असून, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती यासारख्या पद्धतीमुळे जमिनीचा पोत वाढून जमनी सुपीक होण्यास मदत होईल.
- डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणू