पनवेलमध्ये तीन लाखांहून अधिक उत्तर भारतीय मतदार
भाजपकडे स्वीकृत नगरसेवक देण्याची मागणी
खारघर, ता. २० (बातमीदार) : पनवेल शहर व परिसरात उत्तर भारतीय समाजातील मतदारांची संख्या सुमारे तीन लाखांहून अधिक असल्याचा दावा उत्तर भारतीय समाज संघटनांकडून करण्यात येत आहे. एवढी मोठी लोकसंख्या असतानाही महापालिका कारभारात अपेक्षित प्रतिनिधित्व मिळत नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने उत्तर भारतीय समाजाला न्याय देत स्वीकृत नगरसेवकाची संधी द्यावी, अशी एकमुखी मागणी समाज संघटनांनी केली आहे.
पनवेल शहर आणि लगतच्या परिसरात उद्योग, बांधकाम, वाहतूक, लघुउद्योग, किरकोळ व्यापार तसेच विविध सेवा क्षेत्रात उत्तर भारतीय समाज मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज पनवेलमध्ये स्थायिक झाला असून, शहराच्या आर्थिक, सामाजिक व औद्योगिक विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. तरीही महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत या समाजाला थेट प्रतिनिधित्व मिळालेले नाही, ही खंत वारंवार व्यक्त होत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संख्या निर्णायक ठरणारी आहे. अनेक प्रभागांमध्ये या मतदारांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असून, निवडणूक निकाल ठरविण्याची ताकद या समाजाकडे आहे. मतदानाच्या वेळी हा समाज सक्रिय आणि एकसंघ भूमिका घेत असल्याचे यापूर्वीच्या निवडणुकांतून दिसून आले आहे. मात्र, निवडणूक संपल्यानंतर त्यांच्या प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची भावना समाजात बळावत आहे. संख्या असूनही प्रतिनिधित्व नाही, ही भावना आता अस्वस्थ करणारी ठरत आहे. त्यामुळे भाजपने या समाजाच्या भावना ओळखून किमान एक तरी स्वीकृत नगरसेवक उत्तर भारतीय समाजातून नियुक्त करावा. यामुळे समाजाला न्याय मिळेलच, शिवाय शहराच्या सर्वांगीण विकासात अधिक समन्वयाने काम होईल, असा विश्वास उत्तर भारतीय समाजातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.