कस्तुरबा रुग्णालयातील परिचारिकांच्या दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित
दफ्तरदिरंगाईमुळे वेतनवाढ व थकबाकी रखडली; कामगार संघटनेचे आक्षेप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यरत परिचारिकांच्या २० वर्षांच्या दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. आस्थापना व लेखा विभागातील अयोग्य कार्यपद्धती व दफ्तरदिरंगाईमुळे पात्र असूनही अनेक परिचारिका वेतनवाढ, अनुज्ञेय भत्ते व थकबाकीपासून वंचित राहत असल्याचा आरोप मुंबई म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघाने केला आहे.
याप्रकरणी संघटनेने पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मात्र, महिनाभरात हा प्रश्न मार्गी लागेल, असे कस्तुरबा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. श्रीनंदा लावंड यांनी स्पष्ट केले आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, कस्तुरबा रुग्णालयातील परिचारिकांना यापूर्वी १२ वर्षांच्या सेवेनंतर पहिली कालबद्ध पदोन्नती व त्या अनुषंगिक वेतनवाढ देण्यात आली होती. या पदोन्नतीचे वेतननिश्चिती लेखापरीक्षण नायर रुग्णालयाच्या लेखा विभागाकडून पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेच्या १०, २० व ३० वर्षांच्या सुधारित कालबद्ध पदोन्नतीच्या परिपत्रकानुसार पुढील लाभ देण्याचा निर्णय झाला. मात्र, २० वर्षांची दुसरी कालबद्ध पदोन्नती देताना नव्याने आवश्यक असलेल्या लेखापरीक्षणाऐवजी पहिल्या पदोन्नतीचेच लेखापरीक्षण पुन्हा सुरू करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. परिचारिकांवर होत असलेल्या या अन्यायामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या कालबद्ध पदोन्नतीचे झालेले लेखापरीक्षण पुन्हा न करता, थेट २० वर्षांच्या दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीसाठी आवश्यक नस्तीची तपासणी व लेखापरीक्षण पूर्ण करून तातडीने पदोन्नतीचे आदेश, वेतनवाढ व प्रलंबित थकबाकी अदा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस संजीवन पवार यांनी केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात माहिती देताना अधीक्षक डॉ. श्रीनंदा लावंड यांनी सांगितले की, कालबद्ध पदोन्नतीच्या संबंधित फाइल्स नूतनीकरणाच्या कामामुळे विविध विभागांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. आता त्या फाइल्सचे ऑडिट सुरू असून, काही कर्मचारी निवडणूक कामासाठी नियुक्त झाल्यामुळे प्रक्रिया रखडली होती.
आर्थिक अडचणी
या प्रक्रियेत पहिल्या पदोन्नतीच्या नस्तीमध्ये कथित त्रुटी दाखवून फाइल्स पुन्हा दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्यामुळे दुसऱ्या पदोन्नतीचे आदेश, सुधारित वेतनवाढ व थकबाकी रखडली आहे. त्यामुळे अनेक परिचारिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे चिटणीस संतोष कांबळे यांनी दिली.
महिन्याचा कालावधी लागणार
संबंधित कर्मचारी रुजू झाल्यानंतर पुन्हा ऑडिट सुरू करण्यात आले आहे. सर्व ऑडिट पूर्ण झाल्यानंतर फाइल्स उपायुक्तांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येतील. उपायुक्तांच्या मंजुरीनंतर हा प्रश्न निकाली निघेल. यासाठी सुमारे महिनाभराचा कालावधी लागू शकतो, असे अधीक्षक डॉ. श्रीनंदा लावंड यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.