अर्थकारण उलगडणार सोप्या पद्धतीनं अन् वेगवेगळ्या भाषांमध्ये
‘सकाळ’तर्फे लवकरच सादर होणार बहुभाषिक पॉडकास्ट सीरिज
मुंबई, ता. ३० : अर्थकारणाचे विविध पदर उलगडून दाखवणाऱ्या बहुभाषिक पॉडकास्टची स्वतंत्र सीरिज लवकरच सादर होणार आहे. आर्थिक धोरणे, गुंतवणूक, स्टार्टअप्स, विमा, पेन्शन, शेअर बाजार, मूल्यवान धातू अशा अनेक विषयांमधील घडामोडी, त्यांचे होणारे दूरगामी परिणाम हे सर्व साध्या-सोप्या भाषेत उलगडून सांगणारी ही पॉडकास्ट सीरिज असेल. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या पुढाकाराने सुरू होणाऱ्या या पॉडकास्ट सीरिजविषयी सविस्तर तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे.
शेअर बाजारामधील वैयक्तिक गुंतवणूकदारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. डिमॅट अकाउंटधारकांची संख्या डिसेंबर २०२५मध्येच जवळपास २.३५ कोटींनी वाढली असून, आता २१.६ कोटींवर गेली आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव २०२४मध्ये जवळपास ६० हजार रुपये इतका होता. आता हाच भाव एक लाख ७० हजारांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांत एक किलो चांदीचा भाव पाऊण लाखावरून आता पावणेचार लाखांपर्यंत गेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणांमुळे जगावर उलटसुलट परिणाम होत आहेत. जगभरातील भू-राजकीय घडामोडींचा परिणाम आर्थिक स्थैर्यावर होत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. याच वेळी भारतासह जगभरात अनेक ठिकाणी स्टार्टअप कंपन्यांची कामगिरी लक्षणीय होत असल्याचे दिसत आहे. अशा कालखंडात केवळ आर्थिक विषयाला वाहिलेल्या बहुभाषिक पॉडकास्टची रचना ‘सकाळ डिजिटल’ने केली आहे. जगातील निवडक तज्ज्ञांकडून अर्थकारण समजून घेत देशभर पोहोचवण्याचा उद्देश या पॉडकास्टमागे आहे. यासाठी मराठीसह इंग्रजी व हिंदीमध्येही पॉडकास्ट सादर होणार आहेत. अर्थ व गुंतवणूक साक्षरतेचाच हा एक भाग आहे.
..
अर्थसाक्षरतेचा पुढचा टप्पा
‘अर्थमंथन’, ‘अर्थविश्व’, ‘पॉझिव्ह्यू’, ‘धन की बात’ यांसह ‘सकाळ मनी’ या वाचकप्रिय मासिकासारख्या उपक्रमाद्वारे ‘सकाळ’ने मराठी वाचकांच्या अर्थसाक्षरतेसाठी तब्बल तीन दशके सातत्याने काम केले आहे. जागतिक पातळीवरील निवडक अर्थतज्ज्ञांची मते व अभ्यास ‘सकाळ’च्या नव्या बहुभाषिक पॉडकास्टद्वारे उपलब्ध करून देणे, हा आता अर्थसाक्षरतेचा पुढचा टप्पा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.