डोंगरदऱ्यात ‘नागली’ने आर्थिक स्थैर्य
जव्हार तालुक्यात चार हजार ८०० हेक्टरवर लागवड
संदीप साळवे ः सकाळ वृत्तसेवा
जव्हार, ता. ३१ ः तालुक्यात चार हजार ८०० हेक्टरवर नागलीची लागवड होते. कमी पाऊस, दगडमातीची जमीन, मर्यादित साधनसामग्री असूनही तग धरून उगवणाऱ्या नागलीमुळे डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे.
शेतकऱ्यांसाठी नागली पिकास कणसरी म्हणजेच दैवत मानले जात आहे. हे केवळ पीक आज अनेकांच्या जगण्याचा कणा बनले आहे. बदलत्या हवामानामुळे इतर पिके अपयशी ठरत असताना नागली मात्र शेतकऱ्यांच्या सोबत उभी राहिली आहे. पाऊस कमी पडला तरी नागली काहीतरी देऊन जाते, असे समाधान अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. या पिकामुळे वर्षभर कुटुंबासाठी अन्नाची हमी मिळते, तर विक्रीतून आर्थिक मदतही होते. त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नागली पीक जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरत आहे.
-----------------------------
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व
नागली (रागी) धान्य आरोग्यदायी आणि उपयुक्त ठरत आहे. कॅल्शियम, लोह व तंतुमय घटकांनी समृद्ध असलेली नागली लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी लाभदायक आहे. मधुमेह व रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास नागली मदत करते. कमी पावसात, निकृष्ट जमिनीतही उत्पादन देणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. नागलीपासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांना मागणी असल्याने उत्पन्नवाढीस हातभार लागत आहे.
------------------------------
अर्थव्यवस्थेला चालना
नागलीची भाकरी, सत्त्व, आंबील, लाडू, डोसा व पापड हे पदार्थ आरोग्यदायी असल्याने नागरिकांचा कल त्याकडे वाढत आहे. मधुमेह, रक्तदाब व पचनविकारांवर उपयुक्त ठरणारे हे पदार्थ आता शहरी बाजारातही लोकप्रिय आहेत. महिला बचत गटांमार्फत नागलीपासून विविध पदार्थांची निर्मिती सुरू असून, रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.
-------------------------
नागलीच्या पिकाला दैवत म्हणून पुजले जाते. पेरणीपूर्वी, कापणीनंतर पारंपरिक पद्धतीने पूजा करून नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आजही जपली आहे. बदलत्या जीवनशैलीतही नागलीचे महत्त्व कमी झालेले नसून आरोग्य, श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम दिसतो.
- सचिन शिंगडा, शेतकरी
-------------------------
गावपातळीवर कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी नाचणीचा वापर केला जातो. नाचणीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, स्फुरद पुरेशा प्रमाणात असते. आजारी माणसांसाठी नाचणीचा आहार उपयुक्त व गुणकारी मानला जातो. तसेच रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते.
- डॉ. रामदास मराड, जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.