विकासकामांना गती
निवडणुकीनंतर महापालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत
रस्ते, आरोग्य व पायाभूत प्रकल्पांना नवसंजीवनी
वाशी, ता. ३१ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेमुळे काही काळ संथावलेल्या शहरातील विकासकामांना आता मोठा वेग मिळू लागला आहे. आचारसंहिता, निवडणूक यंत्रणेची व्यस्तता आणि प्रशासकीय मर्यादा यांमुळे रस्ते, पूल, आरोग्य सुविधा व नागरी सेवांशी संबंधित अनेक प्रकल्प तात्पुरते थांबवण्यात आले होते. निवडणूक कामासाठी सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी गुंतल्याने प्रत्यक्ष विकासकामांवर परिणाम झाला होता.
विशेषतः स्थापत्य विभागाअंतर्गत सुरू असलेल्या काही कामांमध्ये दर्जाबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने प्रशासनाने गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी काही प्रकल्प तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला होता. नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता टिकाऊ विकास साधावा, या भूमिकेतून हे पाऊल उचलण्यात आले होते.
आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच महापालिका प्रशासन पुन्हा पूर्ण क्षमतेने कामाला लागले आहे. सर्व विभागांना प्रलंबित प्रकल्पांना तातडीने गती देण्याचे निर्देश देण्यात आले असून, ठेकेदारांनाही वेळापत्रक, गुणवत्ता व नियोजनाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे-बेलापूर रस्त्यावरील कामे वेगाने सुरू झाली असून, शहरातील सर्व नोडमधील अंतर्गत रस्त्यांची कामेही पुन्हा मार्गी लागली आहेत.
आरोग्य क्षेत्रातही महत्त्वाची प्रगती होत असून, दिघा रुग्णालयाच्या प्रकल्पाचे काम निवडणुकीनंतर वेगाने सुरू झाले आहे. याशिवाय तलाव सुशोभीकरण, पाणीपुरवठा व मलनिस्सारण वाहिन्या, ड्रेनेज साफसफाई, पूरनियंत्रण उपाययोजना, उद्याने व पदपथांची कामेही गतीने सुरू आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कामांना प्राधान्य देत ठोस वेळापत्रक आखण्यात आले आहे.
चौकट
गुणवत्ता व पारदर्शकतेवर भर
निवडणूक काळातील खोळंबा भरून काढताना केवळ वेग नव्हे, तर गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रत्येक प्रकल्पावर तांत्रिक देखरेख वाढवण्यात येत असून, दर्जाहीन कामांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. येत्या काही महिन्यांत अनेक अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास जातील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.