भिवंडी, ता. १ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेत नुकतेच नगरसेवकपदी निवडून आलेल्या एका नगरसेवकाच्या घरी वॉचमन टोळीने संगनमत करून घरफोडी केल्याची धक्कादायक घटना शहरातील कामतघर परिसरात घडली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल २६ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप भोईर हे नुकत्याच झालेल्या भिवंडी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २१ मधून विजयी झाले आहेत. ३० जानेवारीला त्यांच्या भाच्याचा साखरपुडा वाडा येथे असल्याने संदीप भोईर कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या चंदनबाग, भारत कॉलनी येथील हिरा कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये बाथरूमची ग्रील तोडून प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडून आठ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम; तसेच १३.२७५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण २६ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला.
भोईर घरी परतल्यानंतर फ्लॅट आतून बंद असल्याचे आढळून आले. दरवाजाला धक्का देऊन आत प्रवेश केल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी वॉचमन पती-पत्नीचा शोध सुरू केला असता वॉचमन कल्याण परिसरात आढळून आला. कुटुंबीयांनी त्याला पकडून नारपोली पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी भोईर यांच्या तक्रारीवरून नारपोली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा माग काढत आहे.
परिसराची रेकी?
अवघ्या एक महिन्यापूर्वी या इमारतीसाठी नवीन वॉचमन कामावर रुजू झाला होता. त्याची पत्नी संदीप भोईर यांच्या घरी घरकामासाठी येत होती. ३० जानेवारीला रात्री नऊ वाजता वॉचमनकडे दोन अज्ञात व्यक्ती आल्याची माहिती आहे. त्या सर्वांनी एकत्र पार्टी करत भोईर कुटुंबीयांसह बाहेरगावी गेल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर परिसराची रेकी करून मध्यरात्री २ ते ३ वाजताच्या सुमारास या टोळीने घरफोडी केल्याचा संशय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.