उल्हासनगर महापालिकेत स्थिर सत्ता
महापौर-उपमहापौरांनी स्वीकारला पदभार
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : तब्बल चार वर्षे प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेत अखेर लोकनियुक्त नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मंगळवारी महापौर व उपमहापौरपदासाठी झालेल्या बिनविरोध निवडीनंतर दोघांनीही अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यामुळे महापालिकेच्या राजकारणात स्थैर्य आले असून, रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
महापौर व उपमहापौर पदभार स्वीकारण्याचा औपचारिक कार्यक्रम उल्हासनगर महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडला. या वेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे उपस्थित होते. शिवसेना (शिंदे गट) यांच्या अश्विनी कमलेश निकम यांनी महापौरपदाची, तर भारतीय जनता पक्षाचे अमर लुंड यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली. या सोहळ्यासाठी महापालिकेचे सर्व ७८ नगरसेवक उपस्थित होते.
महापौर व उपमहापौरपदासाठी नामांकन दाखल करण्याच्या अंतिम वेळेपर्यंत कोणताही विरोधी उमेदवार न आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे कोणताही वाद न होता सर्वानुमते नवे नेतृत्व निश्चित झाले. चार वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय कारभारात अडकलेल्या महापालिकेत अनेक विकासकामे आणि धोरणात्मक निर्णय प्रलंबित राहिल्याची चर्चा होती. अशा परिस्थितीत आता लोकनियुक्त नेतृत्व मिळाल्याने शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी महापौर व उपमहापौरांवर आली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर महापौर अश्विनी निकम आणि उपमहापौर अमर लुंड यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देत प्रशासनाशी समन्वय साधून पारदर्शक व गतिमान कारभार राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
--------------
उल्हासनगरच्या नागरिकांनी आम्हाला दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी संपूर्ण निष्ठेने काम करेन. चार वर्षांनंतर लोकनियुक्त नेतृत्वाला मिळालेली ही जबाबदारी केवळ पदाची नसून, शहराच्या भवितव्याची आहे. सर्वांना सोबत घेऊन विकासाचा समतोल आणि पारदर्शक आराखडा राबवण्याचा माझा ठाम निर्धार आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करत उल्हासनगरला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन.
-अश्विनी कमलेश निकम, महापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.