सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ ः गेली सहा वर्षे नवी मुंबई महापालिकेवर असलेल्या प्रशासक राजवटीमुळे लोकप्रतिनिधींचे प्रशासनासोबत नाते तुटले होते; परंतु आता निवडणूक झाल्यामुळे मतदारांसह प्रशासनाला हक्काचे लोकप्रतिनिधी मिळाले आहेत. या नगरसेवकांच्या सहकार्यामुळे स्वच्छ भारत योजना स्पर्धेअंतर्गत होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणासाठी प्रशासनाचे बळ वाढणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत महापालिका प्रशासनाकडून नागरिकांचा अभिप्राय यावर अधिक भर दिला जाणार आहे. गेली सहा वर्षे महापालिकेवर लोकप्रतिनिधींची समिती नसल्यामुळे स्वच्छतेत महापालिकेचा ‘एकला चलो रे’ सुरू होते; परंतु आता दिघा ते बेलापूर आणि १४ गावांमध्ये १११ जागांवर नगरसेवकांची मोठी फौज महापालिकेत निवडून आली आहे. त्यामुळे महापालिकेचे स्वच्छता स्पर्धेत अधिक ताकद मिळणार आहे. या वर्षी होणाऱ्या स्पर्धेच्या अनुषंगाने महामार्गांच्या स्वच्छतेकडे अधिक काटेकोरपणे नियमित लक्ष देण्यात येणार आहे. बाजारपेठांमधील स्वच्छतेबाबत तेथील विक्रेत्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. मासळी मार्केटमध्ये स्वच्छता राखण्यासाठी स्टिलच्या टेबलचा वापर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.
आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक
आजचे विद्यार्थी हे भविष्यातील शहराचे जबाबदार नागरिक असल्याने रस्त्यावर कचरा टाकू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, ओला-सुका कचरा वर्गीकरण निर्मितीच्या ठिकाणी म्हणजे घरातूनच करावे, प्लॅस्टिक पिशव्या व सिंगल यूज प्लॅस्टिक वापरण्याचे पूर्णपणे बंद करावे, हात नियमितपणे स्वच्छ धुवावेत, ‘थ्री आर’ म्हणजे कचरा कमी करणे व त्याचा पुनर्वापर करणे आणि त्यापासून पुनर्निर्मिती करणे ही त्रिसूत्री उपयोगात आणावी, स्वच्छतागृहांचा वापर करावा व ती फ्लश करून स्वच्छ ठेवावीत, अशा स्वच्छतेच्या सात सवयींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी शाळांमध्ये स्वच्छतेविषयी, तसेच पर्यावरणाविषयी जागृती करणारे सोप्या भाषेतील चित्रमय फलक ठिकठिकाणी लावावेत, तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना व कल्पनांना उत्तेजन देणारे स्वच्छता व पर्यावरणविषयक विविध उपक्रम सातत्याने राबवावेत, अशाही सूचना डॉ. शिंदे यांनी दिल्या.
शाळांतील सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनची देखभाल
शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन लावण्यात आल्या आहेत. त्या कार्यान्वित असतील, याकडे बारकाईने लक्ष द्यावे. महाविद्यालयीन युवकांनाही स्वच्छता उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे, असे सूचित करत त्यांनी केलेल्या कामाचे प्रशस्तिपत्र द्यावे, असे आयुक्तांनी प्रशासनाला सूचित केले.
स्वच्छतागृहांची स्वच्छता
सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांवरील निरीक्षण व नियंत्रण यांची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत क्षेत्रीय स्तरावर स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांनी नियमित लक्ष ठेवून पार पाडावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. स्वच्छताकर्मींना उपलब्ध करून दिलेल्या हजेरी शेड सुव्यवस्थित असल्याची खात्री करणे, तसेच त्याठिकाणी प्रथमोपचार व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था अशा आवश्यक सुविधा उपलब्ध असण्याबाबत कार्यवाही करावी. त्यांना काम करताना वापरायची सुरक्षा साधने मिळाली आहेत काय व त्यांच्याकडून त्याचा वापर केला जात आहे का, वापर होत नसेल तर न वापरण्यामागची कारणे जाणून घ्यावीत व त्यामध्ये सुधारणा करावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
लोकसहभाग महत्त्वाचा
स्वच्छतेविषयी अधिक व्यापक जनजागृती करण्यासोबतच निर्मितीच्या ठिकाणी कचरा वर्गीकरण केला जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विभाग कार्यालयामार्फत सोसायट्यांमध्ये स्वच्छतेबाबत नागरिकांशी सुसंवादात्मक उपक्रम ठेवावेत, त्यामध्ये स्थानिक नगरसेवकांना सहभागी करून घ्यावे. गावठाण व झोपडपट्टी भागातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
सर्वंकष स्वच्छता
रस्ते, रस्त्यांच्या बाजूच्या जागा, उड्डाणपूल, उड्डाणपुलाखालील जागा, दुभाजक, बॅकलेन, मैदाने या ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमांमध्ये सातत्य राखावे, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. सध्या मैदानांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात असून त्यामध्ये नियमितता राखावी व मैदानांच्या कडेला कचरापेट्या ठेवण्यात याव्यात, असे निर्देश देण्यात आले.
नागरिकांचा अभिप्राय महत्त्वाचा
नागरिकांचे अभिप्राय, सूचना व तक्रारी यांची दखल घेऊन त्याची तत्परतेने अंमलबजावणी करावी व ‘सिटीझन फिडबॅक’विषयी व्यापक कार्यवाही करावी, अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.
पाडकामातून निघणाऱ्या राडारोड्यावर लक्ष
बांधकाम व पाडकाम कचरा महापालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळी जाईल, याबाबत अधिक जनजागृती करावी व राडारोडा भरारी पथके सक्षम करण्यासाठी डेब्रिजवर निरीक्षण व तपासणी करण्याची कार्यवाही राबविण्याकरिता मोटारसायकल उपलब्ध करून द्याव्यात, असेही आयुक्तांनी सूचित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.